राजधानी दिल्लीत काल रात्रीपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका आणि पाण्याची टंचाई सोसत असलेल्या दिल्लीकरांसाठी ही आनंदाची बातमी असली तरी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहे. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ येथील छत कोसळून एकाचा मृत्यू, तर तीनजण जखमी झाल्याची माहिती दिल्ली अग्निशामक विभागाकडून देण्यात आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टर्मिनलवरून होणारे सर्व उड्डाण पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव येथील कामकाजही थांबविले गेले आहे.

पहाटे ५.३० वाजता विमानतळाकडून छत कोसळल्याचा फोन आला असल्याची माहिती अग्निशामक विभागाने दिली. दरम्यान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्य म्हटले की, ते स्वतः या दुर्घटनेवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मदतकार्यासाठी सूचना देत आहेत.

मंत्री राम मोहन नायडू म्हणाले, “टर्मिनल एकवर छत कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर मी स्वतः बारकाईने याकडे लक्ष देऊन आहे. टर्मिनल १ वर खोळंबलेल्या प्रवाशांना मदत पोहोचविण्याचे आदेश विमानतळ प्रशासनाला दिले गेले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून याठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू आहे.”

अनेकजण सोशल मीडियावर दिल्लीतील पावसाचे फोटो टाकत आहेत. एका युजरने एक्स अकाऊंटवर टाकलेल्या व्हिडीओमध्ये टर्मिनल १ वर छत गळती होताना दिसत आहे.

दरम्यान रात्रीपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीच्या अनेक भागात पाणी साचल्याचे निदर्शनास आले आहे. वाहनं नादुरूस्त झाल्यामुळे आणि पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनं उभी आहेत. त्यामुळे आज सकाळी अनेकठिकाणी वाहतूक कोंडीचीही समस्या उद्भवली आहे.

Story img Loader