करोना परिस्थिती हाताळण्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर कायम टीका करत असतात. त्यांच्या ट्विट्सच्या माध्यमातून ते मोदींच्या कारभारावर हल्ला करत असतात. आताही त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून मोदींवर गंभीर आरोप केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, सकारात्मकता हा पंतप्रधानांचा पीआर स्टंट आहे. त्यांच्या कृतीमुळे निर्णयांमुळे झालेले करोनाचे मृत्यू झाकण्यासाठी हा करण्यात आला आहे.
‘Positivity’ is a PR stunt to hide the actual number of Corona deaths PM’s actions have caused.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 27, 2021
त्यांचं हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहेत. अनेकांनी त्यांच्या मताशी सहमत असल्याचं ट्विट केलं आहे, तर काही जणांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेची झोड उठवण्याची मालिका गेल्या काही दिवसांपासून कायम ठेवली आहे. सेंट्रल विस्टा प्रकल्प, करोना व्यवस्थापन, लसीकरण, पेट्रोल डिझेल दरवाढ यासह अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसात देशात करोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. ‘व्हॅक्सिनची खरेदी केंद्राने करावी आणि त्याचं वितरण राज्यांना करावं. त्यानंतर प्रत्येक गावात व्हॅक्सिन सुरक्षितरित्या पोहोचू शकेल. एवढी साधी गोष्ट केंद्र सरकारच्या लक्षात येत नाही?’, असं टीकास्त्र त्यांनी ट्विटरवरून सोडलं आहे.
तसंच राहुल गांधी यांनी पंतप्रधान अहंकारी असल्याचा अप्रत्यक्ष टोला हाणला आहे. ‘एक तो महामारी, उस पर प्रधान अहंकारी’ असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. या ट्वीटसोबत त्यांनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांच्या आरोपांचा दाखला दिला आहे. त्यांनी करोनाच्या उपलब्ध मात्रा आणि जागतिक आरोग्य संघटनेची नियमावली यांचा कुठेही तालमेल लक्षात ठेवला नसल्याचा संदर्भ घेतला आहे.