बोस्टन मॅरेथॉनमध्ये घडवून आणण्यात आलेला स्फोट हे केवळ एकटय़ा व्यक्तीचे कृत्य असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमेरिकेसारख्या मुक्त देशात अशा प्रकारच्या हल्ल्यांना आळा घालणे शक्य नसल्याचा इशारा सुरक्षा तज्ज्ञांनी दिला आहे.
मॅरेथॉनसारख्या ठिकाणी हजारो प्रेक्षकांची गर्दी होत असते, अशा वेळी एखाद्या व्यक्तीला पाठीवरील बॅगेतून बॉम्ब आणता येणे ही अशक्य बाब नाही. त्यामुळे हा हल्ला एकटय़ा व्यक्तीचे कृत्य असण्याची शक्यता आहे, असे एफबीआयच्या बॉम्बपथकातील निवृत्त तंत्रज्ञ केव्हिन माइल्स यांनी म्हटले आहे. केवळ एकाच व्यक्तीच्या कृत्यामुळे अशा प्रकारचे स्फोट घडवून आणता येतात. त्यामुळे समन्वय, माहिती आणि गुप्तचर यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. बॉम्बस्फोटांचा इतिहास पाहिला तर एकाच व्यक्तीने ते घडविल्याचे स्पष्ट होईल, असेही माइल्स म्हणाले. मॅरेथॉनसारख्या ठिकाणी हजारो प्रेक्षकांची गर्दी असते, प्रत्येकाच्या पाठीवरील बॅगेत काय आहे ते तपासणे शक्य नाही. आमच्या देशात मुक्त वातावरण आहे, हा रशिया अथवा क्युबा देश नाही, असेही ते म्हणाले.