पुढील सार्वत्रिक निवडणुका मुदतीपूर्वीच होतील ही शक्यता गृहीत धरून भाजपने प्रचारासाठी आक्रमक रणनीती आखली आहे. या प्रचारात दक्षिणेकडील राज्ये आणि विकास आणि उत्तम प्रशासन यावर भर देण्यात येणार आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी येथे
सांगितले.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कितीही मोठे दावे केले तरी काँग्रेसची पकड दिवसेंदिवस सैल होत चालली असल्याने निवडणुका लवकर होण्याची शक्यता आहे. विद्यमान सरकार उलथवून टाकण्याच्या संधीची जनता प्रतीक्षा करीत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत कशाला प्रतीक्षा करावयाची, असा दिल्लीत मतप्रवाह आहे, असेही नायडू म्हणाले.
तोटा कमी करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यातच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे घ्याव्या, अशी दिल्लीत जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळेच आम्ही सर्व प्रदेशांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. निवडणुका नोव्हेंबर महिन्यात झाल्यास आमच्याकडे १०० दिवस आहेत आणि एप्रिल महिन्यात झाल्यास आमच्याकडे २०० दिवस आहेत, असेही ते म्हणाले.
देशभरात मेळावे, जाहीर सभांचे आयोजन करण्यात येईल आणि त्यासाठी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे जोरदार दौरे सुरू होतील आणि लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंग हे नेते मेळावे आणि जाहीर सभांना संबोधित करतील, असेही नायडू म्हणाले.

Story img Loader