बनारस हिंदू विद्यापीठाने ‘हिंदू धर्म’ या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम आहे.
या अभ्यासक्रमामुळे जगाला हिंदू धर्माच्या अनेक अज्ञात पैलूंबाबत माहिती मिळेल आणि या धर्माची शिकवण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, असे विद्यापीठाचे मुख्याधिकारी (रेक्टर) असलेले प्रा. व्ही.के. शुक्ला यांनी सांगितले. ‘भारत अध्ययन केंद्रा’च्या कला शाखेतील तत्त्वज्ञान व धर्म, संस्कृत आणि प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र या विभागांच्या समन्वयाने हा अभ्यासक्रम चालवला जाणार आहे.
एका परदेशी विद्यार्थ्यासह ४५ विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रवेश घेतला असल्याचे शुक्ला यांनी मंगळवारी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर सांगितले. तर, दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमाची ४ सत्रे आणि १६ पेपर असतील, अशी माहिती भारत अध्ययन केंद्राचे समन्वयक सदाशिव कुमार द्विवेदी यांनी दिली. अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करण्याची कल्पना सर्वप्रथम पंडित गंगानाथ झा व पंडित मदनमोहन मालवीय यांनी दिली होती. मात्र काही कारणांमुळे त्या वेळी हा अभ्यासक्रम सुरू होईल शकला नाही, असे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या वाराणसी केंद्राचे संचालक विजय शंकर शुक्ला म्हणाले.