देशातील मानांकित शिक्षणसंस्था असलेल्या आयआयएमच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी वाढत्या असहिष्णुतेवर चिंता व्यक्त करणारं पत्र पंतप्रधानांना पाठवल्याची एकीकडे चर्चा सुरू असतानाच पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंदू नसणाऱ्यांना वाराणसीतील गंगा घाटावर प्रवेश नसल्याचा इशारा देणारे पोस्टर्स संपूर्ण वाराणसीमध्ये झळकल्याचं समोर आलं आहे. या पोस्टर्समुळे खळबळ उडाली असून सोशल मीडियावर हे पोस्टर्स व्हायरल होताच ते काढण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे.
काय आहे या पोस्टर्समध्ये?
हे पोस्टर्स विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून लावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या पोस्टर्सवर या दोन्ही संस्थांची नावं देखील टाकण्यात आली असून हिंदू नसणाऱ्यांना प्रवेश नसल्याचा मथळा पोस्टर्सवर आहे. हिंदी भाषेत हे पोस्टर्स लिहिण्यात आले आहेत.
“हिंदू नसणाऱ्यांना प्रवेश नाही. गंगा माता, काशीचे घाट आणि मंदिर हे सनातन धर्म, भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि आस्थेचे प्रतीक आहेत. ज्यांची सनात धर्मावर श्रद्धा आहे, त्यांचं इथे स्वागत आहे. नाहीतर हे ठिकाण पिकनिक स्पॉट नाही”, असं या पोस्टरवर लिहिलं आहे. यात खाली “ही विनंती नसून इशारा आहे”, असं म्हटलं आहे. पोस्टरमध्ये सगळ्यात खाली विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांची नावं लिहिण्यात आली आहेत.
पोलिसांनी पोस्टर्स काढले
यासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचं वाराणसी पोलिांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. “या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून त्यासंदर्भात तपास सुरू केला आहे. स्थानिक भेलुपूर पोलीस स्थानकामार्फत याची चौकशी सुरू आहे. हे पोस्टर्स लावतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. स्थानिकांच्या मदतीने हे पोस्टर्स काढले जात आहेत”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
“अशा व्यक्ती घाटाचं पावित्र्य भंग करातात”
दरम्यान, “हिंदू नसलेल्या व्यक्ती काशीमधल्या घाटांचं पावित्र्य भंग करतात. त्यामुळेच हा इशारा त्यांना देण्यात आला आहे”, अशी प्रतिक्रिया बजरंग दलाचे काशीमधील व्यवस्थापक निखिल त्रिपाठी रुद्र यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. “सनातन धर्मावर श्रद्धा नसणाऱ्यांना हा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी घाटावर एका मुलीचा बीअर पितानाचा फोटो समोर आला होता. हे घाट आणि मंदिरं सनातन धर्माची प्रतिकं आहेत. जर अशी कोणती व्यक्ती घाटावर दिसली, तर आम्ही त्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊ”, असं देखील त्रिपाठी यांनी नमूद केलं.