सध्या भारतात दारिद्रय़रेषेविषयी व नेमक्या किती कमी रुपयांत जेवण मिळते यावर नको इतका खल झालेला असतानाच दारिद्रय़ व त्याच्याशी निगडित सर्व समस्यांनी मानवी मेंदूची शक्ती कमी होते, परिणामी दरिद्री व्यक्ती जीवनातील विकासाच्या इतर अंगांकडे लक्षच देऊ शकत नाही, असे भारतीय-अमेरिकी संशोधनात दिसून आले आहे. त्यामुळे दारिद्रय़ हा एक शाप त्याचबरोबर दुष्टचक्र आहे, या जुन्याच उक्तीवर नव्याने शिक्कामोर्तब झाले आहे.  देशातील लोक खातेपिते व सुखी असतील, त्यांचे उत्पन्न चांगले असेल तरच प्रगती होऊ शकते, असा या संशोधनाचा अर्थ आहे.
होते काय?
दारिद्रय़ामुळे मेंदूवर जो ताण येतो त्यामुळे गरीब लोकांचा बुद्धय़ांक १३ अंकांनी कमी होतो. त्यामुळे ज्या लोकांना पुरेशी आर्थिक साधने नसतात त्यांच्या हातून चुका होतात, तसेच त्यांच्याकडून चुकीचे निर्णय घेतले जातात. परिणामी त्यांच्या आर्थिक पेचप्रसंगात भरच पडते. दारिद्रय़ हे दुष्टचक्र असते, त्या खाईत सापडलेला माणूस त्याला त्यातून बाहेर काढणारे इतर मार्ग अनुसरण्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. एवढेच नव्हे, तर दारिद्रय़ामुळे संबंधित लोकांची आकलन क्षमताही कमी होते. बिले भरण्यास पैसे नसणे, काटकसर करावी लागणे याचे अनेक परिणाम या पद्धतीने होतात. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षण, नोकरी-धंदा, प्रशिक्षण हे मार्ग आहेत हे माहीत असूनही तो मानसिक दृष्टीने त्याकडे लक्ष केंद्रित करू शकत नाही. व्यक्तीची तर्कशक्ती व आकलनशक्ती दोन्हीवर परिणाम होतो. सर्वसाधारण व्यक्तीला आर्थिक अडचणी असतील, तर त्याची आकलन क्षमता कमी होऊन बुद्धय़ांक १३ अंकांनी घटतो.
जेव्हा रोजीरोटीची चिंता नसते तेव्हा कमी उत्पन्न गटातील लोकही श्रीमंत गटातील लोकांइतकेच कार्यक्षमतेने काम करतात. दारिद्रय़ामुळे जी दडपणे येतात त्यामुळे चिंता वाटत राहते व त्यातच मेंदूची शक्ती खर्च होते. – जियिंग झाओ, संशोधक
संशोधन काय?
 २०१० व २०११ मध्ये न्यू जर्सी मॉल येथे ४०० व्यक्तींना या संशोधनात सहभागी करून घेण्यात आले होते. विशेष म्हणजे यात भारतातील दारिद्रय़ाचे परिणाम शोधण्याकरिता ४६४ ऊस उत्पादक शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला होता. हे शेतकरी त्यांच्या वार्षिक उत्पन्नातील ६० टक्के उत्पन्न या उसाच्या पिकातून कमावितात. उसाचा हंगाम वर्षांतून एकदा असतो. हंगामानंतर हे शेतकरी श्रीमंत असतात, पण हंगामापूर्वी ते गरिबीचा अनुभव घेतात. या शेतकऱ्यांपैकी प्रत्येकाची हंगामापूर्वी व हंगामानंतर चाचणी घेऊन त्यांची कामगिरी तपासण्यात आली. त्यात हंगामोत्तर काळात ज्या चाचण्या घेतल्या त्यात त्यांचे यश हंगामापूर्वीच्या चाचण्यांपेक्षा जास्त होते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा