बँकॉक : जगातील गरीब देशांपैकी एक असलेल्या आणि सध्या गृहयुद्धात अडकलेल्या म्यानमारमध्ये शुक्रवारी भूकंपाचे संकट कोसळले. म्यानकार आणि शेजारच्या थायलंड या देशांमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात १४४ जणांचा मृत्यू झाला, तर ७३० जण जखमी झाले. किमान ३० लाख नागरिक विस्थापित झाले असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.
म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मंडाले शहराजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे लागोपाठ सात धक्के बसले, त्यापैकी ७.७ तीव्रतेचा सर्वात मोठा धक्का होता. भूकंपानंतर म्यानमार व थायलंडमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आणि अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. दुभंगलेले रस्ते, उघडलेले महामार्ग, कोसळलेले पूल असे चित्र भूकंपग्रस्त भागांत होते. म्यानमारमधील लष्करशाहीने भूकंपानंतर सहा प्रांतांत आणीबाणीची घोषणा केली.
थायलंडची राजधानी बँकॉकही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. तीन ठिकाणी निर्माणाधीन इमारती कोसळल्या. त्यात १० जणांचा मृत्यू आणि १६ जण जखमी झाले. शहरात १०१ जण बेपत्ता झाल्याचे बँकॉक प्रशासनाने सांगितले.
शेजारी देशांतही कंपने
म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाची कंपने शेजारील देशांमध्येही जाणवली. कोलकाता आणि इंफाळमध्ये सौम्य कंपने जाणवली असून कोणतेही नुकसान झाले नाही. बांगलादेशमध्ये ढाका, चितगावसह विविध ठिकाणी धक्के जाणवले. चीनमध्ये युनान, सिचुआन प्रांतातही धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले.
सर्वतोपरी मदतीसाठी भारत तयार मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार व थायलंडमधील विनाशकारी भूकंपाबद्दल चिंता व्यक्त केली आणि भारत दोन्ही देशांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. मदतीसाठी अधिकाऱ्यांना सज्ज राहण्यास सांगितले असून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला दोन्ही देशांच्या सरकारांशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे, असे मोदी म्हणाले.