अल्पबचत व सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीत पैसे गुंतवणाऱ्यांना १ एप्रिलपासून त्यांच्या या बचतीवर कमी व्याज मिळणार आहे, कारण व्याजाचे दर ०.१ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. सरकारने या योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थ मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे, की सध्या अल्पबचत व सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर हा ८.८ टक्के होता तो १ एप्रिल २०१३ पासून ८.७ टक्के करण्यात आला आहे. तथापि बचत ठेवींवरील व मुदत ठेवीवरील व्याजदर हे वाढवण्यात आले आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये एक वर्षांच्या बचत ठेवीवर ४ टक्के व्याज दर होता तो कायम ठेवण्यात आला आहे. मुदत ठेवींवर व्याजदर हा ८.२ टक्के होता तो कायम ठेवण्यात आला आहे. एमआयएस म्हणजे मासिक बचत योजनांसाठी पाच वर्षांच्या परिपक्वता मुदतीअखेर ८.४ टक्के व्याज दिले जाणार आहे.
राष्ट्रीय बचतपत्रांवर (एनएससी) पाच व दहा वर्षांसाठी अनुक्रमे ८.५ टक्के व ८.८ टक्के व्याज दिले जाणार आहे. यात ०.१० टक्का कपात करण्यात आली आहे. २०१३-१४ पासून हे नवीन व्याज दर लागू केले जात आहेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (एससीएसएस) ९.३ टक्क्यांऐवजी ९.२ टक्के व्याज दिले जाणार आहे. अल्पबचतीवरचे व्याज हे बाजार दरानुसार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
श्यामला गोपीनाथ समितीने केलेल्या शिफारशीनुसार सरकारने व्याज दर बाजारपेठेशी सुसंगत करण्याचे ठरवले आहे.

Story img Loader