पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासाठी येथे आयोजिण्यात आलेल्या मेजवानीत मंगळवारी पाकिस्तानातील सत्तारूढ पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या अनेक जेष्ठ नेत्यांनी हजेरी लावली.
येथील भारतीय उच्चायुक्तालयातील उपायुक्त गोपाल बागले यांनी एका हॉटेलमध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासाठी हा खाना आयोजित केला होता. पाकिस्तानचे धार्मिक व्यवहार मंत्री खुर्शीद शाह यांच्यासह विविध पक्षांचे अनेक नेते या भोजन समारंभास उपस्थित होते. यानिमित्ताने विविध पक्षांच्या उपस्थित नेत्यांना तसेच कायदेतज्ज्ञांना नितीशकुमार आणि त्यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांशी चर्चा करण्याची संधी मिळाली. पाकिस्तानचे धार्मिक व्यवहारमंत्री खुर्शीद शाह यांच्यासह नॅशनल असेंब्लीचे उपसभापती फैसल करीम कुंडी, राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे माजी संघराज्यीय मंत्री असीम हुसैन, पीपीपीचे कायदेतज्ज्ञ तसेच पीएमएल-एन गट, पीएमएल-क्यू गट, अवामी नॅशनल पार्टी आणि मुत्तहिदा कौमी मूव्हमेंटचे नेते व ज्येष्ठ पत्रकार यावेळी उपस्थित होते. दक्षिण सिंध प्रांताचा दौरा पूर्ण करून नितीशकुमार आणि त्यांचे शिष्टमंडळ येथे दाखल झाले होते. सिंध प्रांताचे राज्यपाल इशरत-उल-इबाद यांनी नितीशकुमार यांच्यासाठी स्वागत समारंभही आयोजिला होता.पाकिस्तानच्या आपल्या दौऱ्यादरम्यान आपण विविध पक्षांच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेत असून त्यातून या देशाबद्दलची अधिक माहिती आपल्याला प्राप्त होत आहे, असे नितीशकुमार यावेळी म्हणाले. दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानने एकत्र काम करण्याची गरज आहे. हा आशावाद बरोबर घेऊनच मी इस्लामाबादला जात आहे, असे सिंधच्या दौऱ्यापूर्तीनंतर इस्लामाबादला जाण्यापूर्वी त्यांनी सांगितले. भारत-पाकिस्तानदरम्यान परराष्टमंत्री व सचिव पातळीवर सुरू झालेल्या चर्चेबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.नितीशकुमार यांनी शुक्रवारी कराची येथे दाखल झाल्यानंतर सिंधचे मुख्यमंत्री कईम अली शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी वार्तालाप केला. एका हिंदू पंचायतीसमोर भाषण करण्याअगोदर त्यांनी मोहेंजोदडो तसेच काही प्राचीन हिंदू मंदिरांनाही भेट दिली.   

Story img Loader