सन २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या स्फोटातील तसेच सुनील जोशी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना कर्करोग असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले आहे. येथील जवाहरलाल नेहरू कर्करोग रुग्णालयात प्रज्ञासिंग यांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रज्ञासिंग यांच्या काही वैद्यकीय तपासण्या गेले दोन दिवस सुरू होत्या. या तपासण्यांचे निष्कर्ष नुकतेच हाती आले असल्याचे उपचारकर्त्यां डॉक्टरांनी सांगितले. या आजारावर उपचार करण्यासाठी साध्वींनी रुग्णालयात दाखल व्हावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला, मात्र काही धार्मिक विधी करून मगच आपण उपचारार्थ रुग्णालयात दाखल होऊ, असे प्रज्ञासिंग यांनी सांगितले.
प्रज्ञासिंग यांच्या सहमतीशिवाय त्यांना रुग्णालयात दाखल करता येणार नाही, असे भोपाळ मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक एम. आर. पटेल यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून मुंबईतील कारागृहात असलेल्या प्रज्ञासिंग ठाकूर यांना भोपाळ येथे हलविण्यात आले होते. त्याचबरोबर २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथे झालेल्या स्फोटामागील सूत्रधार असल्याचा आरोपही महाराष्ट्र पोलिसांनी प्रज्ञासिंग ठाकूरांवर केला आहे.

Story img Loader