भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ने गेल्या आठवड्यात चांद्रयान-३ ही मोहीम फत्ते केली. इस्रोने भारताचं चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून ऐतिहासिक कामगिरी केली. गेल्या महिन्यात १४ जुलै रोजी इस्रोचं चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं. त्यानंतर ४० दिवसांचा प्रवास करून हे अवकाश यान चंद्रावर उतरलं. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग केलं. त्यानंतर ‘विक्रम’ लँडरमधून ‘प्रज्ञान’ रोव्हर बाहेर पडला आणि त्याने तिथे संशोधन करायला सुरूवात केली आहे. चांद्रयान ३ चंद्रावर उतरल्यापासून विक्रम लँडरच्या माध्यमातून चंद्रावरील वेगवेगळी माहिती, फोटो आणि व्हिडीओ आपल्यासमोर येत आहे.
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरच्या माध्यमातून इस्रोला मिळणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ इस्रो सोशल मीडियावर शेअर करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विक्रम आणि प्रज्ञानने चंद्राच्या पृष्ठभागाचे, तिथल्या खंदकांचे आणि मातीचे फोटो इस्रोच्या बंगळुरूतील मुख्यालयाला पाठवले आहेत. तसेच चंद्रावरील तापमानाची माहितीदेखील इस्रोला मिळाली आहे.
दरम्यान, इस्रोने आज एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रज्ञान रोव्हर जागेवर गोल फिरताना दिसतोय. इस्रोने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की सुरक्षित मार्गाच्या शोधात रोव्हर फिरवण्यात आला. प्रज्ञान रोव्हरच्या या रोटेशनचा व्हिडीओ विक्रम लँडरवरील इमेजर कॅमेऱ्याने शूट केला आहे.
इस्रोने म्हटलं आहे की हा व्हिडीओ पाहून असं वाटतंय, चांदोमामाच्या अंगणात एखादं लहान मूल खेळतंय आणि आई हे सगळं प्रेमाने पाहत आहे, तुम्हालाही असंच वाटतंय ना?
इस्रोने दिली चंद्रावरील तापमानाची माहिती
चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरने चंद्रावरील तापमानाची माहिती दिली आहे. विक्रम लँडरच्या मॉड्यूलवरील ‘चेस्ट’ पेलोडद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर मोजलेल्या तापमानातील फरकाचा आलेख नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. पेलोडवर तापमान मोजण्यासाठी एक उपकरण बसवलं आहे, जे पृष्ठभागाच्या १० सेंटीमीटर खोल जाण्यास सक्षम आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार ‘चंद्र सरफेस थर्मो फिजिकल एक्सपेरिमेंट’ने (चेस्ट) चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमानाची माहिती घेण्यासाठी दक्षिण ध्रुव्राच्या पृष्ठभागावरील मातीचं परिक्षण केलं. इस्रोने ट्विटरवर याची माहिती दिली आहे. या माहितीनुसार चंद्रावरील तापमान कधी उणे १० अंश सेल्सिअस तर कधी ७० अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. इस्रोने सांगितलं की, यामध्ये तापमान मोजण्यासाठी १० सेन्सर्स लावण्यात आले आहेत.
‘प्रज्ञान’ला चंद्रावर आढळलं ऑक्सिजन
दरम्यान, चांद्रयान-३ मोहिमेत इस्रोला मोठं यश मिळालं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर ऑक्सिजनसह काही मुलद्रव्ये आढळली आहेत. ‘प्रज्ञान’ रोव्हवरील लेझर-प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपी (एलआयबीएस) उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर इन-सीटू मोजमाप केलं. तेव्हा हा शोध लागला आहे. ‘प्रज्ञान’ रोव्हरला संशोधनावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर (एस) असल्याचं आढळलं आहे. तर, हायड्रोजनचा (एच) शोध घेतला जात असल्याचं ‘इस्रो’नं सांगितलं आहे.