एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली
भारताच्या चंद्रयान- ३ च्या प्रज्ञान रोव्हरने चांद्रपृष्ठभूमीवरील शिवशक्ती या स्थळाभोवती भ्रमंती सुरू केली असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील वैज्ञानिक रहस्ये उघड करणे हा त्याचा हेतू आहे.
चंद्रयान ३ मोहिमेतील विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाला सर्वप्रथम जेथे स्पर्श केला, त्या जागेचे नामकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती बिंदू असे केले आहे. या विशिष्ट जागेभोवती चंद्रयान ३ चे रोव्हर यशस्वीरीत्या भ्रमंती करीत असल्याची छायाचित्रे लँडर प्रतिमा कॅमेऱ्याने पाठविली आहेत. त्याबाबतची ताजी ध्वनिचित्रफीत इस्रोने (भारतीय अवकाश संशोधन संस्था) जारी केली आहे. ही फीत ४० सेकंदांची आहे.
विवरांनी भरलेल्या चांद्रभूमीवर हे रोव्हर फिरत असल्याचे त्यात दिसत आहे. ते जेथून गेले तेथे त्याच्या चाकाची चिन्हे उमटली आहेत. शुक्रवारी जारी केलेल्या फीतीत हे रोव्हर लँडरवरून चांद्रभूमीवर उतरताना दिसले होते. या रोव्हरने चांद्रभूमीवर आठ मीटर इतके अंतर पार केले आहे. या दरम्यान दोन वैज्ञानिक प्रयोग सुरू करण्यात आले आहेत, असे इस्रोने कळविले आहे.