लैंगिक अत्याचार आणि सेक्स स्कँडल प्रकरणात जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा याला अटक करण्यात आली आहे. आता प्रज्ज्वलचा सक्खा भाऊ सुरज रेवण्णालाही लैंगिक अत्याचार प्रकरणात आता अटक झाल्यामुळे कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे. जेडीएस पक्षाच्या कार्यकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी विधानपरिषदेचा आमदार असलेल्या सुरज रेवण्णाला अटक केली. हासन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील पोलीस ठाण्यात सुरजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, १६ जून रोजी सुरज रेवण्णाने सदर कार्यकर्त्याला फार्महाऊसवर बोलावले होते. फार्महाऊसवर सदर तरूणावर लैंगिक बळजबरी करण्यात आली. तसेच त्याला मारहाणही करण्यात आली. पीडित तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ३७७ अंतर्गत अनैसर्गिक लैंगिक कृत्याचा गुन्हा दाखल केला.

प्रज्ज्वल रेवण्णाच्या भावाचे तरुणावर लैंगिक अत्याचार; आरोप करणाऱ्यावर सुरज रेवण्णाकडून गुन्हा दाखल

पीडित तरूणाने तक्रारीत म्हटले की, सुरजने लैंगिक अत्याचार केल्यानंतर मला राजकारणात चांगले पद देण्याचे आणि माझे राजकीय बस्तान बसविण्याचे आमिष दाखविले. पीडित तरुणाने पुढे म्हटले की, या घटनेनंतर त्याने सुरजला मेसेज करून याबाबत विचारणा केली. तेव्हा सर्व काही ठिक होईल, अशा शब्दात सुरजने आश्वस्त केले होते.

दरम्यान शनिवारी सुरज रेवण्णा आणि त्याचा सहकारी शिवकुमार यांनी यांनी पीडित तरुणाच्या विरोधातच धमकावणे आणि खंडणी मागण्याचा गुन्हा दाखाल केला होता. लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करून तुम्हाला बदनाम करू, अशी धमकी पीडित तरुणाने दिली असल्याचे रेवण्णांकडून दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते.

सुरज रेवण्णाला कशी अटक झाली?

सुरज रेवण्णा शनिवारी हासनमधील पोलीस ठाण्यात पोहोचले. तेव्हा त्यांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. हासनचे पोलीस अधीक्षक सुजीत मोहम्मद म्हणाले की, सुरज रेवण्णाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. सुरज रेवण्णा तिथून पळून जाणार नाही, याची काळजी घेतली गेली.

कोण आहे सुरज रेवण्णा?

सुरज रेवण्णा हा कर्नाटक विधानपरिषदेचा आमदार आहे. सुरज आणि प्रज्ज्वल हे जेडीएसचे नेते, माजी मंत्री आणि आमदार एचडी रेवण्णा यांचे चिरंजीव आहेत. प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या आई भवानी रेवण्णा यांनाही प्रज्ज्वलच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. सुरज आणि प्रज्ज्वल यांचे आजोबा एचडी देवेगौडा हे देशाचे माजी पंतप्रधान होते. तर त्यांचे काका एचडी कुमारस्वामी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत.

Story img Loader