Prajwal Revanna: धर्मनिरपेक्ष जनता दलाचा नेता आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याच्याविरोधात विशेष तपास पथकाने एका बलात्कार प्रकरणात महिला घरकामगाराने केलेल्या आरोपांवरून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आरोपपत्रात रेवण्णाने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचे गंभीर आरोप आहेत.
कोरोना काळात पहिल्यांदा अत्याचार
होलेनारसीपुरा येथील रेवण्णा कुटुंबाच्या फार्महाऊसमध्ये काम करणाऱ्या पीडितेने सांगितले की, २०२१ मध्ये कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार झाला होता. पीडितेने आरोप केला आहे की, रेवण्णाने तिच्यावर गन्नीकडा फार्महाऊस आणि बेंगळुरूमधील निवासस्थानांसह विविध ठिकाणी अनेक वेळा बलात्कार केला.
आत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल
आरोपपत्रात असा दावा करण्यात आला आहे की, रेवण्णाने तिला डांबून ठेवत वारंवार बलात्कार केले आणि अत्याचारांचे रेकॉर्डिंगही केले. पुढे त्याने या व्हिडिओंचा वापर करून तिला गप्प बसण्याची धमकी दिली. आरोपपत्रात असेही म्हटले आहे की, पीडितेचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तिने पुढे येऊन याप्रकरणी तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
१० महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत
गेल्या दहा महिन्यांपासून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत असलेल्या रेवण्णाने अनेक वेळा जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. परंतू, न्यायालयाने प्रत्येक वेळी त्याला जामीन नाकारला आहे.
पुढील सुनावणी ९ एप्रिलला
रेवण्णा याच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलामांतर्ग बलात्कारासह गंभीर गुन्हे दाखल करण्यात आहेत. याव्यतिरिक्त, प्रज्वल रेवण्णा याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ई अंतर्गत खाजगी अनधिकृतपणे छायाचित्रे काढणे आणि ते प्रसारित केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी आता ९ एप्रिल रोजी होणार आहे. हे आरोपपत्र विशेषतः घरकाम करणाऱ्या महिलेच्या तक्रारीशी संबंधित आहे, परंतु रेवण्णाविरुद्ध इतर अनेक खटले प्रलंबित आहेत.
प्रज्वल रेवण्णाच्या वडिलांवरही एफआयआर
२८ एप्रिल ते १० जून २०२४ दरम्यान, होलेनारसीपुरा पोलीस ठाण्यात चार एफआयआर दाखल करण्यात आले होते, तर बेंगळुरूमधील सायबर क्राइम पोलीस ठाण्यात आणखी दोन एफआयआर दाखल करण्यात आले होते. प्रज्वल रेवण्णाचे वडील होलेनारसीपुराचे आमदार एचडी रेवन्ना यांच्याविरुद्धही केआर नगर पोलीस ठाण्यात एक वेगळा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.