Prakash Ambedkar On Dr Babasaheb Ambedkar Defeated twice in Election : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानाचे सर्वत्र पडसाद उमटताना दिसत आहेत. या विधानावरून राजकीय वातावरण देखील चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून अमित शाह आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. यादरम्यान विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्ट्समध्ये काँग्रेसने कशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला याबद्दल माहिती दिली आहे. त्यांना एक यादी देत वेगवेगळे दावे केले आहेत. ज्यामध्ये काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणूकीत दोन वेळा पराभव केल्याच्या पुनरुच्चार करण्यात आला आहे. दरम्यान यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी यासाठी मी काँग्रेसला दोष देणार नाही असे म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

मुंबई आणि भंडारा येथील निवडणुकींमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाल्याबद्दल आपण काँग्रेसला दोष द्यायला तयार नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यांनी सांगितलं की, “मी काँग्रेसला दोष द्यायला तयार नाही. कारण काँग्रेस हा राजकीय पक्ष आहे आणि त्या पक्षाचे त्यावेळचे धोरण होते. फक्त काँग्रेस पक्षच नव्हता तर कम्युनिस्ट पक्षानेदेखील विरोध केला होता. कामगार लढ्यात एकत्र लढल्यानंतरही कम्युनिस्ट पक्षाने स्वत:ची ६० हजार मतं मध्य मुंबई मतदारसंघात कुजवली होती”.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “त्यावेळी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आणि जे राजकीय नेते होते, मी त्या राजकीय नेत्यांना दोष देणार आहे. याच्यासाठी दोष देणार आहे, कारण राखीव मतदारसंघात दोन मतदान होते आणि ते तुम्ही कोणालाही देऊ शकत होता. त्यावेळच्या राजकीय नेत्यांनी नुसतं दोन्ही मतं तुम्ही बाबासाहेबांना द्या हेच जरी सांगितलं असतं तरी बाबासाहेबांना २ लाख ४० हजार मते मिळाली असती आणि ते ७० हजार मतांनी बाबासाहेब निवडणूक जिंकले असते”.

हेही वाचा>> अमित शाहांवरील टीकेला पंतप्रधान मोदींनी दिलं प्रत्युत्तर; डॉ. आंबेडकरांविषयीच्या विधानावरून विरोधकांवर हल्लाबोल!

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “काँग्रेसने विरोध केला, कम्युनिस्टांनी विरोध केला हे जसं बरोबर आहे, तसं त्यावेळचे बाबासाहेबांचे जे सहकाऱ्यांनी… तेव्हा नांदेडमध्येही तेच घडलं, सोलापूरमध्येही तेच घडलं. मद्रास येथे असलेली एक केस उच्च न्यायालयात गेली आणि न्यायालयाने निर्णय असा दिला की, मतदान देण्याचा जो अधिकार आहे, तो एकाला एकच मतदान द्यावं असा नाही, तुम्हाला ज्याला मतदान द्यायचं, त्याला द्या असा आहे…. त्यामुळे ज्यांनी एकाच उमेदवाराला दोन्ही मतं दिली ते वैध ठरवण्यात आली. त्यामुळे काँग्रेसबरोबरच त्यावेळचे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जे नेते होते तेही त्याला जबाबदार आहेत असं मी मानतो”.

“मुंबईच्या उदाहरणातून शिकले नाहीत आणि भंडाऱ्यात देखील त्याचीच पुनरावृत्ती झाली”, असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar on pm modi claim congress defeated dr babasaheb ambedkar in elections twice marathi news rak