पॅरिसच्या हवामान करारावर भारताने संयुक्त राष्ट्रात स्वाक्षरी केली असून जगातील देशांनी या कराराच्या अंमलबजावणी करताना गरीब देशांबाबत हवामान न्यायाची भूमिका घेण्याची गरज आहे, असे मत पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले की, जागतिक वसुंधरा दिनानिमित्त यावर्षी इतिहास घडून आला आहे. १७१ देशांनी पॅरिस करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हा सामुदायिक शहाणपणाचा निर्णय आहे. हवामान करारात शाश्वत जीवशैलीचे फायदे सांगण्यात आले आहेत व काही देशांच्या उधळपट्टीला आळा घालण्याची गरज व्यक्त केली आहे. आज आपण अशीच जीवनशैली चालू ठेवली, तर एकदिवस पृथ्वी आपल्या वास्तव्यासाठी योग्य राहणार नाही. त्यामुळे शाश्वतता फार महत्त्वाची आहे.
आपण जर अशाश्वत पद्धतीने गरजा भागवणे सुरू ठेवले तर आपल्याला जगण्यासाठी पृथ्वीसारखे तीन ग्रह लागतील. माता वसुंधरा एकच आहे, तिची काळजी घेतली पाहिजे असे सांगून ते म्हणाले की, हवामान न्यायाचे तत्त्व पॅरिस कराराच्या प्रस्तावनेत आहे. हवामान न्याय हा गरीब देशांसाठी आवश्यक आहे. चार अब्ज लोक जगात गरीब प्रवर्गात मोडतात. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी योजना आखणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात सरचिटणीस बान की मून यांच्या उपस्थितीत १७० देशांनी ऐतिहासिक हवामान करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
पृथ्वीची तापमान वाढ २ अंश सेल्सियस पयर्ंत रोखताना ती दीड अंश सेल्सियसपर्यंत रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे पॅरिस करारात म्हटले आहे.