जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं आहे. या स्टेडियमला बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं. पुनर्विकसित करण्यात आलेल्या या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामनाही सुरु झाला आहे. मात्र या मैदानाच्या नामकरणावरुन सोशल नेटवर्किंगवर वाद सुरु आहे. अनेकांनी या स्टेडियमला पंतप्रधान मोदींचे नाव दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे  सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचं नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आला दावा विरोधक करत आहेत. तर  सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलामधील एका मैदानाला मोदींचं नाव देण्यात आल्याचा युक्तीवाद भाजपासमर्थकांकडून केला जात आहे.

मोटेरा मैदानाच्या नामकरणावरुन सोशल नेटवर्किंगवर बराच गोंधळ सुरु आहे. #नरेंद्र_मोदी_स्टेडियम, #नरेन्द्र_मोदी_स्टेडियम_मोटेरा असे हॅशटॅग ट्विटरवर चर्चेत आहेत. मात्र त्याचवेळी #सरदार_पटेल_का_अपमान हा हॅशटॅगही चर्चेत असून नवीन स्टेडियमचे नाव बदलण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे भाजपा समर्थकांनी क्रीडा संकुलाचे नाव सरदार वल्लभभाई पटेल असल्याचे म्हटले आहे. नामकरणासंदर्भातील वादावर सोशल नेटवर्किंगवर चर्चा होऊ लागल्यानंतर अनेक केंद्रीय मंत्र्यांनी यासंदर्भातील स्पष्टीकरण ट्विटरवरुन पोस्ट केलं.

स्पष्टीकरण देणाऱ्यांमध्ये केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांनीही ट्विटरवरुन यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. या क्रीडा संकुलाचे नाव सरदार पटेल स्पोर्टस एन्क्लेव्ह असं आहे. या संकुलामधील एका मैदानाला मोदींचं नाव देण्यात आलं आहे. विरोधाभास म्हणजे सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा सन्मान न करणारं कुटुंब आता यावरुन आरडाओरड करत आहे, असा टोला जावडेकर यांनी लगावला होता. विशेष म्हणजेच याच शब्दांमध्ये रिजीजू यांनीही ट्विट केलं आहे.

जावडेकर यांचे ट्विट

रिजीजू यांचे ट्विट

दोन्ही केंद्रीय मंत्र्याच्या ट्विटमधील साम्य पाहून अल्ट न्यूजचे संस्थापक असणाऱ्या मोहम्मद झुबैर यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. जावडेकर आणि रिजीजू यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत, “केंद्रीय मंत्र्यांना व्हॉट्सअपवरुन सारखेच (मेसेज) सॅम्पल टॅम्पलेट मिळाले का?,” असा प्रश्न झुबैर यांनी विचारला आहे.

दरम्यान, मोटेरा हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम ठरलं आहे. २४ फेब्रुवारी २०२० रोजी याच स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यानिमित्ताने नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. होतं. मोटेरा स्टेडियमध्ये सर्व अत्याधुनिक प्रकारच्या सेवा उपलब्ध असून, पूर्वीच्या स्टेडियममध्ये ५३ हजार प्रेक्षक बसू शकत होते. त्याचा पुनर्विकास करण्यात आल्यानंतर या स्टेडियम आसन क्षमता १ लाख १० हजार इतकी झाली आहे.