संपूर्ण देशभरात आठवी वर्गापर्यंत हिंदी विषय सक्तीचा करण्याची शिफारस शिक्षण समितीने मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे केली असल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत यासंबंधी सांगितलं आहे. समितीकडून अशी कोणतीही शिफारस आली नसल्याचं ते बोलले आहेत.

‘नवीन शिक्षण धोरण समितीने आपल्या मसुदा अहवालात कोणत्याही भाषेची सक्ती करण्याची शिफारस केलेली नाही. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या चुकीच्या वृत्तामुळे हे स्पष्टीकरण देत आहे’, असं प्रकाश जावडेकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

इस्त्रोचे माजी अध्यक्ष के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील ९ सदस्यीय मंडळाने नवीन शैक्षणिक धोरण तयार केले आहे. देशभरातील शाळा आणि कॉलेज स्तरावर नवं शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी 2017 मध्ये ही समिती गठीत करण्यात आली होती. त्यांनी आपल्या अहवालात ‘भारतकेंद्रीत’ आणि ‘वैज्ञानिक’ शिक्षण पद्धती अवलंबण्याचे सुचवले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या अखेरीस हा अहवाल मनुष्यबळ मंत्रालयाकडे सोपवण्यात आला आहे. लवकरच या अहवालावरून मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याबरोबर आमची बैठक होईल, असे या समितीतील एका सदस्याने सांगितले. समितीचा अहवाल तयार असून समितीने बैठकीसाठी वेळ ही मागितला आहे. संसदेच्या अधिवेशनानंतर मला अहवाल मिळेल, असे जावडेकर यांनी म्हटले आहे.

सामाजिक शास्त्राअंतर्गत येणाऱ्या विषयांमध्ये स्थानिक माहिती अभ्यासक्रमात असावी. देशात विविध बोर्डाच्या बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात विज्ञान आणि गणित या विषयाचा अभ्यासक्रम वेगळा ठेवण्यात तथ्य नाही. विज्ञान आणि गणित कोणत्याही भाषेत शिकवा. पण त्याचा अभ्यासक्रम सगळीकडे सारखाच असला पाहिजे, असे समितीने म्हटल्याचे सूत्रांकडून समजते. त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणात पाचवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात अवधी, भोजपुरी, मैथिली सारख्या स्थानिक भाषांचा समावेश असावा अशी शिफरास करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Story img Loader