अभिनेते प्रकाश राज हे नेहमी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते सातत्याने सरकारवर आणि शासनाच्या धोरणावर भाष्य करत असतात. आपल्या ट्वीटच्या माध्यमातून ते आपली मतं व्यक्त करत असतात. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील भूमिकांमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असणारे अभिनेते प्रकाश राज यांनी नुकतंच एक ट्वीट केलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या ट्विटमधून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खडे बोल सुनावले आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल, म्हणजेच २ सप्टेंबरला तेलंगणा दौऱ्यावर होत्या. यादरम्यान त्यांनी कामारेड्डी जिल्ह्यातील बिरकुर येथील एका रेशन दुकानात जात नागरिकांशी चर्चा केली. त्या दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याने त्या खूपच चिडल्या. पंतप्रधानांचा फोटो रेशन दुकानात का नाही, असा सवाल विचारत संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं आणि तेलंगणा सरकारवरही टीका केली आहे. यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अर्ध्या तासाच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचा फोटो दुकानात लावण्यास सांगितले.
याच घटनेवरून अभिनेता प्रकाश राज यांनी निर्मला सीतारामन यांना धारेवर धरलं आहे. सीतारामन यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “असा उद्धटपणा खपवून घेतला जाणार नाही. लक्षात ठेवा, हे सामान्य जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत. आम्ही लोकशाही आहोत. तुम्ही दानधर्म करत नाही आहात. नीट वागा.”
दरम्यान, याप्रकरणावर तेलंगणाचे आरोग्य मंत्री टी हरीश राव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अर्थमंत्र्यांनी रेशन दुकानांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यास सांगणं अयोग्य आहे. अर्थमंत्री जे काही बोलत आहे ते पंतप्रधानांचा दर्जा खालावणारे आहे. हे हास्यास्पद आहे. मात्र, त्या नागरिकांना अशा पद्धतीने सांगत आहेत की सर्व तांदूळ केंद्र सरकार मोफत पुरवते,” असे प्रत्युत्तर टी हरिश राव यांनी दिलं आहे.