काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी त्यांच्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप करत ते म्हणाले, आमच्या पक्षात अनेक नेते आहेत, जे केवळ राम मंदिरच नव्हे तर श्रीरामाचाही तिरस्कार करतात. आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, मला अनेकदा जाणवलं आहे की, काँग्रेसमधील काही नेते राम मंदिर आणि श्रीरामाचा तिरस्कार करतात. केवळ हिंदुत्वाचाच नव्हे तर हिंदू शब्दाचा तिरस्कार करतात. हिंदू धर्मगुरुंचा अपमान करतात.
आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, जे रामाचा तिरस्कार करतात ते हिंदू असू शकत नाहीत. राम मंदिराला खूप विरोध झाला आणि हा विरोध आपण सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्याद्वारे आपल्याला समजलं की, कोणाची रामावर श्रद्धा आहे आणि रामाचा तिरस्कार कोण करतं? मी पक्षाचा भाग असलो तरी त्याचा अर्थ असा नाही की मला सत्याला सत्य म्हणता येणार नाही, किंवा असत्याला असत्य म्हणता येणार नाही.
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी यावेळी इंडिया आघाडीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदावरून हटवणं हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. परंतु, विरोधी पक्ष नरेंद्र मोदींचा इतका तिरस्कार करतात की, ते मोदींचा तिरस्कार करता करता ते आता भारताचा तिरस्कार करू लागले आहेत.
प्रमोद कृष्णम म्हणाले, मोदींनी संसदेची नवीन इमारत उभी केली तर हे (विरोधक) त्याचा विरोध करतील, त्यांनी एखाद्या ट्रेनला ‘वंदे भारत’ नाव दिलं तर त्याचा विरोध करतील. तुम्ही मोदींवर टीका करा. परंतु, पंतप्रधानपदाचा तिरस्कार करू नका. मोदींचा तिरस्कार करता करता विरोधक इतके गोंधळले आहेत की, भारताची सभ्यता आणि संस्कृती विसरून गेले आहेत.
हे ही वाचा >> “मोदी दिवसातून दोनदा लाखो रुपयांचे सूट बदलतात”, राहुल गांधींची टीका; म्हणाले, “मी फक्त…”
काँग्रेस कार्यकारिणीवर नाराजी
दोन महिन्यापूर्वी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. आगामी लोकसभा निवडणूक आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ३९ सदस्यीय काँग्रेस कार्यकारी समिती जाहीर केली. या कार्यकारिणीवर काँग्रेसच्या प्रमोद कृष्णम यांनी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा कृष्णम म्हणाले होते, काँग्रेसमध्ये हिंदू शब्दाचा द्वेष करणारे काही नेते आहेत, या लोकांना पक्षाला डाव्या विचारसरणीच्या मार्गावर न्यायचं आहे. हे लोक वंदे मातरम् आणि भगव्याचा द्वेष करतात. क्षातील काही लोकांना माझी वेशभूषा आणि कपाळावरील टिळ्याची चिड येते. परंतु, या गोष्टी मी सोडू शकत नाही.