अयोध्येतील राममंदिराची द्वारे खुली करण्याचा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा निर्णय चुकीचा होता आणि बाबरी मशीद पाडण्याचे कृत्य म्हणजे नि:संशय विश्वासघात होता त्यामुळे भारताच्या प्रतिमेला धक्का बसला, असे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.
राममंदिराची द्वारे उघडण्याचा निर्णय चुकीचाच होता, ही कृती टाळता येणे शक्य होते, असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे. प्रणब मुखर्जी यांच्या ‘द टर्ब्युलंट इयर्स : १९८०-९६’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या पुस्तकाच्या दुसऱ्या खंडात मुखर्जी यांनी वरील बाबी स्पष्ट केल्या आहेत.
बाबरी मशीद पाडण्याचे कृत्य नि:संशय विश्वासघाताचे होते, राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सारासार विचार न करताच एका धार्मिक स्थळाची नासधूस करण्यात आली. त्यामुळे भारत आणि परदेशातील मुस्लीम समाजाच्या भावनांना ठेच पोहोचली. तसेच त्यामुळे भारताच्या सहिष्णू आणि अनेकतत्त्ववादाच्या प्रतिमेलाही धक्का बसला, असेही मुखर्जी यांनी म्हटले आहे.
मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केल्याने समाजातील सामाजिक अन्याय कमी करण्यास मदत झाली, मात्र त्यामुळे आपल्या लोकसंख्येतील विविध घटकांमध्ये विभाजन होऊन ध्रुवीकरण झाले. भारतीय समाजात १९८९ ते १९९१ हा कालावधी हिंसाचाराचा आणि दुफळी माजविणारा होता, असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी झाली आणि सीमेपलीकडील दहशतवाद फोफावला, रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रश्नाने देश हादरला. देशभरातून विटा गोळा करून त्या समारंभपूर्वक अयोध्येत नेण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या प्रचारामुळे जातीय तणाव वाढला, असेही त्यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2016 रोजी प्रकाशित
राममंदिराची द्वारे खुली करण्याचा राजीव गांधींचा निर्णय चुकीचा – मुखर्जी
अयोध्येतील राममंदिराची द्वारे खुली करण्याचा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा निर्णय चुकीचा होता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-01-2016 at 03:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pranab mukherjee comment on babri masjid