Sharmistha Mukherjee: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे सुपुत्र आहेत, त्यामुळे त्यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसने केली. शुक्रवारी रात्री केंद्र सरकारकडून स्मृतिस्थळासाठी जागा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. स्मृतीस्थळाच्या वादानंतर आता भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत नेते प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जीने मात्र काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्मृतीस्थळाची मागणी केल्यावर संताप व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, माझ्या बाबांचे निधन झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारी समितीने साधी शोकसभाही आयोजित केली नव्हती.
गुरुवारी (२६ डिसेंबर) माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान काँग्रेसने शुक्रवारी स्मृतीस्थळाची मागणी करत त्याच ठिकाणी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी मागणी केली. यानंतर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एक्सवर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, बाबांचे ज्यावेळी निधन झाले, त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकारी समितीने साधी शोकसभाही आयोजित केली नाही. तेव्हा काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने मला सांगितले की, राष्ट्रपतींसाठी अशाप्रकारे शोकसभा आयोजित केली जात नाही. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. बाबांच्या डायरीतून मला कळले की, माजी राष्ट्रपती केआर नारायणन यांचे निधन झाल्यानंतर कार्यकारी समितीची बैठक बोलाविण्यात आली होती आणि बाबांनीच शोक संदेशाचा मसुदा लिहिला होता.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी भाजपाचे नेते सीआर केसवन यांच्या एका एक्स पोस्टला शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. केसवन यांनी काँग्रेसने स्मृतीस्थळासाठी जे पत्र लिहिले त्याचा दाखला देऊन टीका केली होती. काँग्रेसने गांधी कुटुंबा व्यतिरिक्त इतर राजकीय नेत्यांची कशी अवहेलना केली, यावर केसवन यांनी प्रकाश टाकला होता.
डॉ. मनमोहन सिंग यांचे २००४ ते २००९ या काळात माध्यम सल्लागार म्हणून काम करणाऱ्या डॉ. संजय बारू यांनी लिहिलेल्या “द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर” या पुस्तकातही याचा उल्लेख केला होता. २००४ साली माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांचे निधन झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारने त्यांच्या स्मारकासाठी दिल्लीत जागा दिली नाही, असा उल्लेख या पुस्तकात आढळतो. सत्ता असूनही काँग्रेसने पीव्ही नरसिंहराव यांचे स्मारक बांधले नाही, असेही यात नमूद करण्यात आलेले आहे.