माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असल्याने त्यांच्यावर काँग्रेसमधून मोठया प्रमाणावर टीका होत आहे. प्रणव मुखर्जी यांच्या निर्णयावर त्यांच्या स्वत:च्या मुलीने टीका केली आहे. तुम्ही भाजपवाल्यांना खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी देत आहात असं शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटलं आहे. काल रात्री सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सुद्धा प्रणवदा मी तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती असे टि्वट केले.

एकूणच प्रणव मुखर्जी यांच्यावर जी टीका सुरु आहे त्यामागे सोनिया गांधी असल्याचे वृत्त एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने दिले आहे. सोनिया गांधी यांच्याच इशाऱ्यावरुन प्रणव मुखर्जी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यांच्याच सांगण्यावर अहमद पटेल यांनी प्रणव मुखर्जींविरोधात टि्वट केले असे एनडीटीव्हीने म्हटले आहे. नागपूरमध्ये थोडयाचवेळात प्रणव मुखर्जी यांच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. प्रणव मुखर्जी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असून संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपासाठी ते नागपुरात आले आहेत.

काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे प्रणव मुखर्जी उद्या होणाऱ्या कार्यक्रमात काय बोलणार ? कोणती भूमिका मांडणार ? याबद्दल प्रचंड उत्सुक्ता आहे. कारण काँग्रेस आणि आरएसएस यांच्या विचारधारेत कमालीचे अंतर असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या प्रत्येक भाषणातून आरएसएसवर सडकून टीका करत असतात. त्यामुळे मुखर्जी उद्या काय बोलणार ? याकडे राजकीय तज्ञ, पत्रकारांचेच नव्हे तर सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे.

Story img Loader