माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी काल नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या कार्यक्रमानंतर त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ते संघाच्या अन्य नेत्यांसोबत आरएसएसच्या पद्धतीनुसार हात छातीजवळ पकडून प्रणाम करताना दिसत आहेत. त्यांच्या डोक्यावर काळी टोपी दाखवण्यात आली आहे.
खरंतर त्यावेळी प्रणव मुखर्जी उभे राहून समोर पाहत होते. कुठलाही प्रणाम त्यांनी केला नाही. पण काही खोडकर प्रवृत्तीच्या लोकांनी मूळ फोटो मॉर्फ करुन प्रणव मुखर्जींच्या डोक्यावर काळी टोपी आणि त्यांना प्रणाम करताना दाखवले आहे. या मॉर्फ फोटोसाठी प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी भाजपा आणि आरएसएसला जबाबदार धरले आहे.
मला याच गोष्टीची भिती वाटत होती म्हणून मी आरएसएसच्या कार्यक्रमाला जाण्याआधी वडिलांना याच गोष्टीसाठी सावध केले होते. कार्यक्रम संपून काही तास होत नाही तोच भाजपा/आरएसएसच्या डर्टी ट्रीक्स डिपार्टमेन्टने आपले काम चालू केले आहे असे शर्मिष्ठा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
See, this is exactly what I was fearing & warned my father about. Not even few hours have passed, but BJP/RSS dirty tricks dept is at work in full swing! https://t.co/dII3nBSxb6
— Sharmistha Mukherjee (@Sharmistha_GK) June 7, 2018
शर्मिष्ठा मुखर्जी यांना प्रणव मुखर्जींचा निर्णय पटला नव्हता. तुम्ही भाजपवाल्यांना खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी देत आहात असं शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटलं होतं. तुमचं भाषण विसरलं जाईल, फक्त व्हिजुअल्स राहितील. खोटी वक्तव्यं जोडून तुमचे व्हिजुअल्स परसवले जातील’, असे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटले होते.