Pranab Mukherjee Daughter: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिस्थळासाठीच्या जागेवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसनं सरकारकडे स्मृतिस्थळासाठी जागेची मागणी केल्यानंतर सरकारकडून तशी तजवीज करण्याचा शब्द देण्यात आला. मात्र, जागा नेमकी कुठे असावी? यावरून दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रपती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिठा मुखर्जी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. त्यावर आता त्यांचे बंधू व प्रणव मुखर्जींचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमके काय होते शर्मिष्ठा मुखर्जींचे आरोप?
काँग्रेसकडून मनमोहन सिंग यांच्या स्मृतिस्थळासाठी जागेची मागणी होत असताना शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसकडून प्रणव मुखर्जींसाठी साधी शोकसभाही घेतली गेली नाही, असा आरोप करण्यात आला. “बाबांचे ज्यावेळी निधन झाले, त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकारी समितीने साधी शोकसभाही आयोजित केली नाही. तेव्हा काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने मला सांगितले की, राष्ट्रपतींसाठी अशाप्रकारे शोकसभा आयोजित केली जात नाही. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. बाबांच्या डायरीतून मला कळले की, माजी राष्ट्रपती केआर नारायणन यांचे निधन झाल्यानंतर कार्यकारी समितीची बैठक बोलाविण्यात आली होती आणि बाबांनीच शोक संदेशाचा मसुदा लिहिला होता”, असा दावा एक्सवरील पोस्टमध्ये केला.
त्यांच्याप्रमाणेच इतरही नेत्यांकडून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आलं. यानंतर आता प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण देताना हे दावे फेटाळले आहेत. “माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा मी दिल्लीतच होतो. मी त्याच घरात राहात होतो. मला माझ्या बहिणीनं सांगितलं की ‘बाबा खाली पडले आणि जखमी झाले आहेत, मी त्यांना रुग्णालयात घेऊन जात आहे’. मग मीही लगेच धावत रुग्णालयात गेलो. पण डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत”, अशी आठवण अभिजीत मुखर्जी यांनी एएनआयला सांगितली.
“मला जेवढं माहिती आहे, त्यानुसार तेव्हा कोविडचा काळ होता. तेव्हा खूप सारे निर्बंध होते. त्यामुळे लोकांना एकत्र जमता आलं नाही. मी तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फोनही केला होता. पण त्यांच्या व्यवस्थापनाने अगदी कुटुंबातील सदस्यांनाही अंत्यविधींना उपस्थित राहण्याची परवानगी दिली नाही. ते म्हणाले की फक्त २० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. त्यामुळे सर्व कुटुंबीय, मित्रपरिवार अशा सगळ्यांमधून फक्त २० लोक उपस्थित होते”, असं ते म्हणाले.
“प्रणव मुखर्जींसाठी काँग्रेसला अंत्ययात्रा काढायची होती”
“काँग्रेस पक्षाला बाबांच्या निधनानंतर अंत्ययात्रा वगैरे काढायची होती. पण त्या वेळी कोविडमुळे त्यांना तशी यात्रा काढता आली नाही. पण नंतर काँग्रेसच्या नेत्यांनी भेट दिली. राहुल गांधीही भेटायला आले. खुद्द पंतप्रधानही आले होते. अनेक वरीष्ठ नेते भेटायला आले होते”, असं अभिजीत मुखर्जींनी नमूद केलं.
“मला वाटतं शर्मिष्ठा काँग्रेसच्या कोअर वर्किंग कमिटीच्या बैठकीबाबत बोलत असावी. त्यावेळी शोकसभेसंदर्भात काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक बोलावण्यात आलेली नव्हती. पण तशी बैठक बोलावण्याची प्रथा बहुधा नसावी. कदाचिक मी चुकीचाही असेन. पण नंतर तशी बैठक झाली आणि सर्व गोष्टी नियमित पार पडल्या”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.