आमदार प्रणिती शिंदे यांनी आमच्या संदर्भात केलेले विधान मागे घेऊन माफी मागावी, नाहीतर त्यांच्याविरोधात बदनामीच खटला दाखल करू, असा इशारा एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी दिला. आमची भाषणे आक्षेपार्ह वाटतात, तर मग पोलीसांकडे आमच्याविरोधात तक्रार का केली नाही, असाही प्रश्न त्यांनी प्रणिती शिंदे यांना विचारला.
कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत एमआयएम पक्षाचे नेते कोणत्याही समाजाच्या बाजूने बोलत नसून, ते देशाच्या विरोधात बोलतात, असा आरोप केला होता. देशद्रोहींना आपल्या देशात जागा असता कामा नये, असे सांगत त्यांनी या पक्षाच्या नेत्यांच्या भाषणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांच्या या आरोपांना असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले, २००४ ते २०१२ या काळात आम्ही केंद्रामध्ये माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यावेळी प्रणिती शिंदे यांनी आमचा विरोध का केला नाही. आम्ही कॉंग्रेससोबत असताना त्यांनी असे वक्तव्य का केले नाही. आमची भाषणे त्यांना आक्षेपार्ह वाटतात, तर मग आमच्याविरोधात पोलीसांकडे तक्रार का केली नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.
लोकसभा निवडणुकीवेळी प्रणिती शिंदे यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याकडे मदत मागितली होती, असाही गौप्यस्फोट ओवैसी यांनी यावेळी केला. सोलापूर हा भारताचा भाग असून, ती प्रणिती शिंदे यांची वैयक्तिक संपत्ती नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Story img Loader