मित्रांकडून मस्करी होणं, प्रँक म्हणून एखाद्याची थट्टा करणं, असले प्रकार सगळीकडेच सुरू असतात. पण थट्टा-मस्करीचीही एक मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली तर मस्करी अंगाशी येऊ शकते. बंगळुरूमध्ये एका मित्राच्या आयुष्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. २४ वर्षांच्या एका तरुणाच्या गुदद्वारात त्याचे मित्राने कंप्रेसरच्या साहाय्याने हवा भरली. त्यानंतर काही वेळातच या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी मुरली नावाच्या एका २३ वर्षीय मुलाला या प्रकरणात अटक केली आहे. तो कार सर्विस सेंटरमध्ये काम करतो. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत पावलेल्या योगेश आर. या तरूणाने सोमवारी त्याची मोटारसायकल मुरली काम करत असलेल्या कार सर्विस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी नेली. मोटारसायकलमध्ये दुरुस्ती करून ती धुवून देण्यासाठी त्याने मुरलीला सांगितले. मुरलीने मोटारसायकलचे काम करून ती धुतली. त्यानंतर मोटारसायकल सुकविण्यासाठी तो एअर कंप्रेसरने हवा मारत होता. गंमत म्हणून मुरलीने योगेशच्या तोंडावर कंप्रेसरने हवा मारली. हवेपासून वाचण्यासाठी योगेशने त्याच्यापासून तोंड फिरवून वाकून उभा राहिला. यानंतर मुरलीने योगेशच्या पाठी पृष्ठभागावर हवेचा झोत मारायला सुरुवात केली.
कंप्रेसरचा पाईप थोड्या अंतरावर असला तरी हवेचा मारा इतका वेगात होता की, योगेशच्या गुदद्वारात हवा गेली. योगेश त्याचक्षणी जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र बुधवारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
योगेश बंगळुरूच्या थनीसंद्रा येथे आपल्या आजीबरोबर राहत होता. तो डिलिव्हरी एजन्ट म्हणून कार्यरत होता. योगेशवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, हवेचा वेग इतका होता की, त्याच्या आतड्यांमध्ये हवा भरली गेली. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या, मात्र उपचाराचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही आणि बुधवारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.