‘आम आदमी’प्रमाणे जगण्याचा वायदा करून सत्तेवर आलेल्या ‘आप’वर ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण व योगेंद्र यादवप्रणीत स्वराज्य अभियानने निशाणा साधला आहे. आमदारांना तब्बल ४०० टक्क्य़ांनी पगारवाढ देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासल्याची टीका भूषण यांनी केली.
या विषयाच्या बाजूने मतदान करण्याकरिता आपल्या आमदारांना ‘व्हिप’ बजावण्याच्या आम आदमी पक्षाच्या निर्णयावरही भूषण यांनी तोंडसुख घेतले. ते म्हणाले की, ‘आप’च्या नेत्यांनी मोठा बंगला किंवा कार यांचा मोह बाळगणार नसल्याचे सांगितले होते. तसेच, आपला पगारही दुपटीने कमी करण्याची घोषणा केली होती. पण, सामान्य नागरिकाप्रमाणे राहण्याचा वायदा करत त्यांनी आपला पगार ४०० टक्क्य़ांनी वाढविला. सत्तेत आल्यानंतर जाहिरातींचे बजेट २५पट वाढविण्यात आले. आपल्या मर्जीतील माणसांची ७०-८० हजार रुपयांच्या पगारावर सहायक म्हणून नियुक्ती केली.
स्वतंत्र कार्यगट हवा
लोकनियुक्त प्रतिनिधींच्या पगारासंदर्भातील प्रश्न सोडविण्याकरिता स्वतंत्र कार्यगट तयार करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदारांच्या पगारात
चारशे टक्के वाढ
दिल्ली विधानसभेने गुरुवारी आमदारांच्या पगारात ४०० टक्क्यांनी वाढ करताना वेगवेगळ्या भत्त्यांतदेखील दणदणीत वाढ केली आहे. या निर्णयामुळे आमदारांचा पगार १२ हजारांवरून ५० हजारांवर जाणार आहे. तसेच, त्यांचे मासिक पॅकेज ८८ हजारांवरून २ लाख १० हजारांवर जाईल. तर, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्षनेत्यांना ८० हजार रुपये पगार मिळेल. तसेच, त्यांचे भत्त्यांसह एकूण मानधन १ लाख २० हजारांवरून तब्बल ३ लाख ६७ हजार रुपयांवर गेले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant bhushan against salary increment