आम आदमी पक्षाचे नेते प्रशांत भूषण यांनी काश्मीरमधून सशस्त्र सेना विशेष अधिकार कायदा(एएफएसपीए) उठविण्याचे वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी त्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे, तर आम आदमी पक्षाने भूषण यांच्या वक्तव्याशी कोणताही संबंध नसल्याचे म्हणत या प्रकरणापासून दूरावा साधला आहे.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) प्रशांत भूषण यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. प्रशांत भूषण यांचे मत म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे आणि नागरिकांमध्ये दूरावा साधणारे आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्वाच्या प्रश्नावर आम आदमीने दाखविलेला हा वैचारिक कमकुवतपणा निषेधात्मक असल्याचे म्हणत भाजपने ‘आप’वर निशाणा साधला, तर भाजप नेते अरूण जेटली यांनी आम आदमी पक्षाच्या या मवाळ भूमिकेनंतर यावर लवकरात लवकर आम आदमी पक्ष योग्य भूमिका घेईल अशी आशा व्यक्त करूया. नाहीतर पक्षाची जलद गतीने उन्नती होण्याआधी अधोगती होईल असेही जेटली म्हणाले.
“राष्ट्रीय सुरक्षेबाबतचे निर्णय तेथील लोकसंख्येच्या बळावर होत नसतात. ते केवळ सुरक्षेच्या विचारांवर ठरविले जातात आणि सध्याची जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पाहता तेथे सुरक्षेची अत्यावश्यक निकड आहे. त्यामुळे तेथील सुरक्षा कमी करण्याचा विचारच खोडसाळपणाचा आहे.” असेही अरूण जेटली म्हणाले. त्यामुळे प्रशांत भूषण यांच्या या काश्मीर सुरक्षेच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चौफेर टीका होत आहेत.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत भूषण म्हणाले होते की, “परकीयकरण रोखण्यासाठी लोकांची मने आणि त्यांचे विचार जिंकणे फार महत्वाचे आहे आणि त्यासाठी एएफएसपीए पहिल्यांदा उठविला गेला पाहिजे. त्यातून मानवी हक्कांवरील उल्लंघन रोखण्यासाठी लष्करी सुरक्षितता मिळेल”   

Story img Loader