भारतीय सैनिक जम्मू-काश्मिरमध्ये स्थानिकांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करीत काश्मिरचा प्रश्न जनमत चाचणी घेवून सोडवावा, अशी विचित्र मागणी केल्याने आम आदमी पक्षाचे नेते प्रशांत भूषण अडचणीत सापडले आहेत. प्रशांत भूषण यांच्या भूमिकेशी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फारकत घेत सावध प्रतिक्रिया नोंदवली. भाजपने मात्र प्रशांत भूषण यांच्यासह काँग्रेसला देखील झोडपले आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत भूषण यांनी काश्मिरविरोधी भूमिका घेतली. काश्मिरमध्ये सैन्य असावे का, याचा निर्णय स्थानिक नागरिकांनी घ्यावा. अंतर्गत सुरक्षिततेच्या नावावर स्थानिकांवर भारतीय सैनिक अत्याचार करीत असल्याचे वृत्त आहे.  हे सरळ- सरळ स्थानिकांच्या मानवाधिकांराचे उल्लंघन आहे. त्यामुळे तेथून सैन्य माघारी बोलवावे, असे विधान प्रशांत भूषण यांनी केले होते.  त्यावर, कश्मिरप्रश्नी  प्रशांत भूषण यांनी केलेल्या विधानाशी असहमत असल्याचे आम आदमी पक्षाचे समन्वयक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. ते म्हणाले की, काश्मिर भारताचा अविभाज्य भाग आहे. प्रशांत भूषण यांनी त्यांचे वैयक्तिक मत नोंदविले. त्याच्याशी मी सहमत नाही. काँग्रेस नेते संजय झा म्हणाले की, काश्मिर देशाचा अविभाज्य भाग आहे, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या नेत्यांना सावधपणे मत नोंदवावे. आम आदमी पक्ष आता एखादी स्वयंसेवी संस्था नाही; एक राजकीय पक्ष आहे, अशा टोला झा यांनी प्रशांत भूषण यांना लगावला.
केजरीवाल यांनी केलेल्या सारवासारवीनंतर भाजपच्या संतापात भर पडली. काश्मिर समस्या न सोडविण्यावर काँग्रेस व आपचे एकमत असल्याची टीका भाजप प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की,पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी काश्मिरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर प्रशांत भूषण यांना कंठ फूटला. काश्मिरप्रश्नी काँग्रेस व आम आदमी पक्षाचे परस्पर सामंजस्याचे राजकारण सुरु असल्याने आम आदमीचा विश्वासघात झाला आहे.
त्या म्हणाल्या की,  काश्मिरमध्ये बर्फ कोसळत असल्याने सीमेवर सध्या शांतता आहे. उभय देशांमध्ये यावर कुणी चकार शब्दही बोलत नाही. अशावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी जम्मू-काश्मिरचा प्रश्न धसास लावण्याचे संकेत देतात व त्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते त्यांचीच री ओढतात.  आम आदमी पक्षाचे खायचे दात व दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, अशा शब्दात लेखी यांनी प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला चढवला.

आम आदमी पक्ष व काँग्रेसमध्ये अभद्र युती झाल्याची टीका मीनाक्षी लेखी यांनी केली. काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करून केजरीवाल यांनी मतदारांचा विश्वासघात केला.  विधानसभा निवडणुकीत एकूण २३ लाख २२ हजार ४१७ मतदारांनी आम आदमी पक्षाला मत दिले. सत्तास्थापनेचा कौल घेण्यासाठी केलेल्या आवाहनाला २ लाख ६६ हजार ९६६ मतदारांनी प्रतिक्रिया दिली. त्यापैकी केवळ १ लाख ९७ हजार ८६ मतदारांनी ‘आप’ला काँग्रेससमवेत युती करून सत्तास्थापन करण्यास सकारात्मक कौल दिला. मिळालेल्या मतांपैकी केवळ ८.५ टक्के मतदारांनी सत्ता स्थापन करण्यास अनुकूलता दर्शवली. प्रत्यक्षात ९१.५ टक्के मतदारांनी सत्तास्थापनेस विरोध नोंदविला होता. केजरीवाल यांनी जनमताचा अनादर करीत केवळ काँग्रेसला फायदा करवून देण्यासाठी दिल्लीत सत्ता स्थापन केली, असा आरोप लेखी यांनी केला.