दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी बंडखोर नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना, लवकरच भेटू, असा संदेश दिल्यानंतर आता भूषण यांनी केजरीवाल यांना नव्याने एक पत्र लिहिले आहे. मात्र या पत्रात भूषण यांनी दीर्घकाळ प्रलंबित राहिलेले प्रश्न उपस्थित केले आहेत.
आपल्या मागण्यांना केजरीवाल यांनी प्रतिसाद दिला नाही, तर आपण पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर पडू, अशी धमकी दिल्याच्या वृत्ताचे मात्र भूषण यांनी जोरदार खंडन केले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर पडण्याची इच्छा आपण व्यक्त केलेली नाही, मात्र दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न पत्रात मांडले आहेत, असे ते म्हणाले.
तथापि, या पत्रात कोणते प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत अथवा ते पत्र केव्हा पाठविण्यात आले आहे, हे भूषण यांनी सांगितले नाही. आम्ही गेल्या काही दिवसांपासून जे प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करीत आहोत तेच प्रश्न आहेत, केवळ ते अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत, असेही भूषण म्हणाले.
प्रशांत भूषण यांच्यासह यादव यांनीही राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली असल्याच्या वृत्ताचा यादव यांच्या निकटवर्तीयांनी इन्कार केला आहे.
पक्षांतर्गत लोकशाही, एकाधिकारशाही आणि संघटनेच्या कारभारातील पारदर्शकता आदी प्रश्न पत्रांतून मांडण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा