आम आदमी पक्षातील दोन गटांमध्ये समेट घडवण्याचे प्रयत्न गुरुवारी निष्फळ ठरले. राष्ट्रीय कार्यकारिणीतून राजीनामा देण्यासाठी अरविंद केजरीवाल गट भाग पाडत असल्याचा आरोप योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांनी केला आहे.
एक तर सन्मानाने राजीनामा द्या किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी केली जाईल, असा संदेशच आम्हाला देण्यात आला, असा आरोप भूषण व यादव यांनी केला.
आपल्या या दोघांसोबत काम करणे शक्य होणार नाही, असे केजरीवाल यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितल्याचे कळते.
पक्षनेतृत्वातील मतभेदांमुळे झालेल्या भांडणातून या दोघांची यापूर्वी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) हकालपट्टी करण्यात आली होती.  दोनच दिवसांपूर्वी या दोघांनी केजरीवाल यांना खुले पत्र पाठवले होते. त्यामध्ये केजरीवाल यांची भेट मागूनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच केजरीवाल यांना पक्षाच्या निमंत्रकपदावरून हटवण्याचा प्रयत्न केला नसल्याचा दावाही पत्रात करण्यात आला होता. मात्र केजरीवाल यांना निमंत्रकपदावरून हटवण्याबाबत यादव व भूषण ठाम आहेत. त्यावरून चर्चा निष्फळ ठरल्याचे केजरीवाल यांचे समर्थक मानले जाणारे आशुतोष यांनी स्पष्ट केले.

Story img Loader