राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या विरोधात एकवटलेल्या सगळ्या विरोधी पक्षांना एक सल्ला दिला आहे. भाजपाला हारवणं कधी शक्य होईल हेच त्यांनी आता सांगितलं आहे. भाजपाच्या विरोधात सगळे विरोधक एकवटले तरीही फक्त तेवढंच उपयोगाचं नाही. एवढंच काय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळेही फारसा काही फायदा निवडणुकीच्या दृष्टीने होईल असं वाटत नाही असंही परखड मत प्रशांत किशोर यांनी मांडलं आहे. विरोधी पक्षांची एकजूट हा फक्त एक देखावा आहे. फक्त नेते एकत्र आल्याने भाजपाला हारवणं शक्य नाही असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे प्रशांत किशोर यांनी?

प्रशांत किशोर यांनी NDTV ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले, “भाजपाला आव्हान द्यायचं असेल तर तुम्हाला भाजपाची ताकद, त्यांची बलस्थानं काय आहेत? याचाच अर्थ हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि कल्याणवाद काय आहे तो समजायला हवा. भाजपाला आव्हान द्यायचं असेल तर कुठल्याही विरोधकाला या तीन गोष्टी विचारात घेऊन त्यांना आव्हान द्यावं लागेल” प्रशांत किशोर पुढे असं म्हणाले की “हिंदुत्ववादी विचारधारांशी लढा देण्यासाठी विचारधारांची एकजूट आवश्यक आहे. गांधीवादी, आंबेडकरवादी, समाजवादी आणि कम्युनिस्ट या विचारधारा महत्त्वाच्या आहेत. मात्र या विचारधारांच्या नावे तुम्ही अंधविश्वास ठेवू शकत नाही. त्या विचारधारा भाजपाच्या विचारधारेला टक्कर देऊ शकतात का? याचा विचार करावा लागेल.”

भाजपाला अशा पद्धतीने हरवता येणार नाही

प्रशांत किशोर म्हणाले, “मी सध्या पाहतोय विरोधी पक्षाचे नेते एकमेकांच्या सोबत दिसत आहेत. कुणी कोणासोबत लंच करतंय कुणी कुणासोबत चहा घेतंय. मला विचारधारांची युती झालेली बघायला आवडेल. कारण एकत्र जेवण करणं आणि चहा पिणं ही भाजपाला हरवण्याची पद्धत नाही.” राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नावे २०१४ च्या निवडणुकांमध्ये अनेक विजय आहेत. प्रशांत किशोर सध्या जन सुराज यात्रेत बिहारचा दौरा करत आहेत.

राजकारणात प्रशांत किशोर यांना पीके या नावानेही ओळखलं जातं. बिहारबाबत ते म्हणाले की , “बिहारचं राजकारण हे अनेक चुकीच्या समजुतींसाठी प्रसिद्ध आहे. तसंच जातीपातींमध्ये अडकलेलं आहे. आत्ता आम्ही असा प्रयत्न करत आहोत की इथे लोक काय करू शकतात? ते किती सक्षम आहेत यासाठी बिहार ओळखला जाईल.”

भारत जोडो यात्रेवरही भाष्य

“राहुल गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा काढली ती फक्त चालण्याशी संबंधित नव्हती. मागच्या सहा महिन्यांत राहुल गांधीवर टीकाही झाली आणि त्यांची स्तुतीही करण्यात आली. तुम्ही जेव्हा सहा महिने चालता, भारत जोडोसारखी यात्रा काढता त्यावेळी तुम्हाला पक्षामध्ये काही बदल झालेले दिसले पाहिजे. ही यात्रा काँग्रेसचं भवितव्य ठरवणारी आहे. माझ्यासाठी यात्रा म्हणजे मिशन नाही तर ज्या भागात ती जाते तो भाग समजून घेण्याचा प्रयत्न आहे.” असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishor advice to opposition said bjp cant be defeated until what did he say scj