Prashant Kishore : बिहारच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले जनसुराज पक्षाचे सुत्रधार प्रशांत किशोर हे पुन्हा चर्चेत आले आहेत. तामिळनाडूमधील अभिनेता-राजकारणी विजय याच्याबरोबर ते एका व्यासपीठावर दिसून आले. बुधवारी झालेल्या या कार्यक्रमात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आपण २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता-राजकारणी विजय ‘तमिझगा वेत्री कळघम (TVK)’ पक्षाला विजय मिळवून देऊ असे किशोर म्हणाले आहेत. महाबलीपुरम येथे टीव्हीकेच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी ही घोषणा केली. येथे बोलताना प्रशांत किशोर यांनी तामिळनाडू येथे आपण माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला प्रसिद्धीमध्ये मागे टाकू असेही म्हटले आहे.

प्रशांत किशोर नेमकं काय म्हणाले?

टीव्हीके पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रशांत किशोर म्हणाले की, “तुम्ही पाहाता की एमएस धोनीच्या नावाची खूप चर्चा होते. तो एकमेव बिहारी आहे जो तामिळनाडूमध्ये माझ्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहे. धोनी तामिळनाडूमध्ये प्रशांत किशोरपेक्षा जास्त लोकप्रिय आहे, पण गल्लत करू नका, पुढच्या वर्षी, जेव्हा मी योगदान देईल आणि तुम्हाला जिंकण्यास मदत करेन, तेव्हा मी लोकप्रियतेत धोनीला मागे टाकेन.”

“जर मी पुढच्या वर्षी टीव्हीकेला विजयी होण्यास मदत केली तर तमिळनाडूमध्ये कोण जास्त लोकप्रिय असेल? दरवेळी चेन्नई सुपर किंग्जला जिंकवून देणारा माझा बिहारी सहकारी एमएस धोनी की प्रशांत किशोर?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला.

पुढे बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, “मला जिंकण्यासाठी माझी स्वत:ची लढाई आहे. त्यासाठी मला तामिळनाडूमधील सर्वात लोकप्रिय बिहारी बनावे लागेल. म्हणून मला चेन्नई सुपर किंग्ज संघाला जिंकवणाऱ्या धोनीशी स्पर्धा करावी लागेल. म्हणून मी टीव्हीकेला तुमच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली जिंकवेन,” असेही प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर यांनी २०२१ मध्ये आपल्या राजकीय सल्लागार म्हणून काम करण्यापासून निवृत्तीची घोषणा केली होती. पण पुन्हा ते हे काम का करत आहेत याबद्दलची भूमिका स्पष्ट करताना प्रशांत किशोर म्हणाले की मृते टीव्हीकेला राजकीय पक्ष म्हणून पाहात नाहीत तर एक चळवळ म्हणून पाहातात.

माझ्यासाठी ते (विजय) राजकीय नेते नाहीत. तो तामिळनाडूसाठी एक आशा आहे, त्यामुळेच मी इथे आलो आहे. टीव्हीके हा माझ्यासाठी राजकीय पक्ष नाही. एक लाखो लोकांची चळवळ आहे ज्यांना तामिळनाडू मध्ये नवीन राजकीय व्यवस्था पाहायची आहे, असेही प्रशांत किशोर म्हणाले.

Story img Loader