BPSC Hunger Strike Updates : पाटणा पोलिसांनी जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांना अटक केली आहे. प्रशांत किशोर हे बेमुदत उपोषणाला बसले होते. गांधी मैदान या ठिकाणी त्यांनी उपोषण आंदोलन सुरु केलं. याच ठिकाणी जाऊन पोलिसांनी कारवाई केली. बीपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या जाव्यात म्हणून प्रशांत किशोर मागच्या चार दिवसांपासून आंदोलनाला बसले होते. आज पहाटे त्यांना अटक करण्यात आली. प्रशांत किशोर आणि पक्षाचे इतर कार्यकर्ते मैदानावर झोपले होते. पहाटे ४ च्या दरम्यान पोलीस आले आणि त्यांना अटक केली. प्रशांत किशोर यांना पोलीस म्हणाले चला आमच्या बरोबर यायचं आहे तुम्हाला. त्यावेळी जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला. ज्यानंतर पोलिसांनी प्रशांत किशोर यांना अटक केली.
पहाटे नेमकं काय घडलं?
पहाटे चारच्या सुमारास बिहार पोलिसांनी प्रशांत किशोर ताब्यात घेतलं. पोलीस त्यांना रुग्णवाहिकेत AIIMS रुग्णालयात घेऊन गेले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी कुठलेही उपचार करुन घेण्यास नकार दिला आहे. पाटणा पोलीस आणि जन सुराजचे प्रमुख प्रशांत किशोर यांच्या समर्थकांमध्ये एम्सच्या बाहेर झटापट पाहण्यास मिळाली. प्रशांत किशोर हे बिहारचे लोक आणि विद्यार्थ्यांसाठी बेमुदत उपोषणाला बसले होते. सरकार आमच्या ऐक्याला घाबरली. त्यांच्याविरोधात शारीरिक हिंसा निंदनीय आहे, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. गांधी मैदानातील झटापटीनंतर पोलिसांनी प्रशांत किशोर यांना उचललं आणि रुग्णवाहिकेतून AIIMS रुग्णालयात नेलं. त्यानंतर त्यांना नौबतपूर येथे नेण्यात आलं.
BPSC वादात काय काय घडलं?
बीपीएससीद्वारे १३ डिसेंबर रोजी एका परीक्षेचा पेपर लिक झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर बहिष्कार घातला.
यानंतर आयोगाने १२ हजार उमेदवारांची परीक्षा पुन्हा एकदा घेतली जावी असे आदेश दिले.
या आदेशानंतर ४ जानेवारीला शहरातल्या विविध केंद्रांवर नव्याने परीक्षेचं आयोजन करण्यात आलं. ९११ केंद्रांवर परीक्षा योग्य पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.
मात्र BPSC च्या परीक्षार्थी उमेदवारांनी समान संधी निश्चित करा असं सांगत सगळ्या केंद्रांवर पुन्हा आंदोलन सुरु केलं.
उमेदवार विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला अपक्ष खासदार पप्पू यादव आणि जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी पाठिंबा दिला. प्रशांत किशोर यांनी तर उपोषणही सुरु केलं. मात्र आज त्यांना अटक करण्यात आली.
तेजस्वी यादव यांना उद्देशून प्रशांत किशोर काय म्हणाले?
“तेजस्वी यादव एक मोठे नेते आहेत. ते विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष या नात्याने माझ्याजागी त्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व करायला पाहिजे होतं. त्यांनी या विरोध प्रदर्शनाच नेतृत्व करावं” असं प्रशांत किशोर यांनी सुचवलं आहे. जन सुराजचे संस्थापक म्हणाले की, “राजकारण कधीही होऊ शकतं. इथे आमच्या पक्षाचा कुठलाही बॅनर नाही.”