काँग्रेस नेतृत्वाशी झालेल्या चर्चेच्या आणि बैठकांच्या फेऱ्यांनंतर, राजकीय आखणीकार प्रशांत किशोर यांनी पक्षप्रवेशाचे ‘आमंत्रण’ मंगळवारी स्पष्टपणे धुडकावून लावले. २०२४ मधील लोकसभा निवडणूक, तसेच पक्षाच्या आगामी धोरणनिश्चितीसाठी नेमलेल्या उच्चाधिकार समितीत सहभागी होण्याचा प्रस्ताव काँग्रेसने किशोर यांना दिला होता. मात्र किशोर यांनी तो मान्य केलेला नाही. विशेष म्हणजे काही राज्यांमध्ये इतर पक्षांसोबत करण्यात येणारी आघाडी तसेच पक्षाचं नेतृत्व राहुल गांधींकडे द्यावं की प्रियंका गांधींकडे यासारख्या मुद्द्यांवरुन मतभेद झाल्याने प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय.
काँग्रेसने केली घोषणा…
काँग्रेस प्रवेशासंदर्भात हंगामी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी प्रशांत किशोर यांच्या तीन बैठका झाल्या होत्या, त्यांची अखेरची बैठक शुक्रवारी झाली होती. त्यानंतर सोनियांनी सोमवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. मंगळवारीदेखील पक्षाच्या १५ रकाबगंज येथील वॉर रूममध्येही बैठक झाली. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास नकार दिला असल्याची माहिती प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून जाहीर केली.
किशोर यांनी व्यक्त केली नाराजी…
प्रशांत किशोर यांनीदेखील स्वतंत्रपणे ट्वीट करून काँग्रेस प्रवेश न करण्याचे कारण स्पष्ट केले. काँग्रेसने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीचा सदस्य बनावे व निवडणुकांची जबाबदारी सांभाळावी असा प्रस्ताव दिला होता, पण तो नाकारला असल्याचे ट्वीट किशोर यांनी केले. ‘‘मला नम्रपणे वाटते की, माझ्यापेक्षा काँग्रेस पक्षाला भक्कम नेतृत्वाची आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे. त्याद्वारे पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करता येईल,’’ असे ट्वीट करून किशोर यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.
प्रशांत किशोर यांची मागणी काय होती?
पक्षातील पद व जबाबदारी निवडणुकांच्या आखणीपुरती मर्यादित न ठेवता पक्षबांधणी व निर्णयप्रक्रियेमध्ये मोकळेपणाने काम करू देण्याची मागणी प्रशांत किशोर केली होती, मात्र पक्षामध्ये अमर्याद अधिकार न देता फक्त उच्चाधिकार समितीचे सदस्य या नात्याने पक्षसेवा करावी असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे किशोर यांनी काँग्रेसमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते.
प्रियंका की राहुल गांधी?
पक्षाचं नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे देण्यासंदर्भात काँग्रेस ठाम असतानाच प्रशांत किशोर हे प्रियंका गांधींच्या नावावर ठाम होते. प्रशांत किशोर यांनी बिहार, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीरबरोबरच इतर महत्वाच्या राज्यांमध्ये जुन्या मित्र पक्षांसोबत जाण्यासंदर्भात मांडलेली भूमिका आणि पक्ष नेतृत्वाबद्दल केलेली मागणी ही काँग्रेसला फारशी पटली नाही. काँग्रेसच्या कार्यकारी मंडळासमोर किशोर यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार आणि पक्षाध्यक्ष या दोन वेगळ्या व्यक्ती असाव्यात असं म्हटल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. पक्षाध्यक्ष म्हणून प्रशांत यांनी सोनिया गांधींसमोर पहिली पसंती प्रियंका गांधींच्या नावाला आहे, असं स्पष्टपणे सांगितलं. मात्र काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा असणाऱ्या सोनियांबरोबरच इतर वरिष्ठ नेतेही या विषयासंदर्भात राहुल गांधींकडेच पुन्हा पक्षाध्यक्ष पद देण्यावर ठाम राहील्याने बोलणं फिस्कटलं.
किशोर यांचं प्रेझेन्टेशन आवडलं पण त्या मागणीला विरोध…
प्रशांत किशोर यांनी २०२४ मधील लोकसभा व आगामी विधानसभा निवडणुका तसेच पक्ष संघटनेतील बदलांसंदर्भात सादरीकरण केले होते. त्याचा अभ्यास करणाऱ्या समितीच्या अहवालावर सोमवारी सोनिया गांधी यांनी चर्चा केली होती. बहुतांश सदस्यांनी प्रशांत किशोर यांना अमर्याद अधिकार देण्याबाबत प्रतिकूल मत व्यक्त केले होते. या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली होती. त्यानंतर पक्षाची आगामी धोरणे ठरवण्यासाठी उच्चाधिकारी समिती नेमण्याची घोषणा करण्यात आली. प्रशांत किशोर यांचे सादरीकरण पक्षाकडे असून त्यातील बहुतांश मुद्दय़ांवर ज्येष्ठ नेत्यांनी सहमती व्यक्त केली होती.