Prashant Kishor hospitalised BPSC protest : बीपीएससी विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांची सोमवारी रात्री तब्येत खालवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर किशोर यांना मंगळवारी पहाटे पाटणा येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखीचा त्रास होत असल्याने किशोर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
प्रशांत किशोर हे बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात २ जानेवारीपासून आमरण उपोषण करत आहेत. बिहार पब्लिक कमिशन (बीपीएससी) पूर्व परीक्षा पुन्हा घेतली जावी या मागणीसाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी सोमवारी पहाटे ताब्यात घेतल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पण त्यांनी न्यायालयात सशर्त जामीन स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.
पुढे प्रशांत किशोर यांना अटक झाल्याच्या १५ तासांनंतर सोमवारी सायंकाळी बिनशर्त जामीन मंजूर करण्यात आला. पाटणा येथील गांधी मैदान येथून पोलिसांनी प्रशांत किशोर यांना सोमवारी पहाटे अटक केली होती, या ठिकाणी आंदोलन करण्यास मनाई असल्याचे कारण पोलिसांनी यावेळी दिले होते.
जन सुराज पक्षाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, “किशोर हे मोकळ्या आकाशाखाली चार रात्री झोपले… डॉक्टरांनी त्यांना काही तपासण्या करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या आजारपणाचे नेमके कारण काही हे आपल्याला लवकरच कळेल”. यादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्या नियोजित स्थळी आंदोलन सुरूच ठेवले आहे.
१२ जानेवारी रोजी बिहार बंद
पूर्णिया येथील अपक्ष खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी १२ जानेवारी बिहार बंदचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते तेजस्वी प्रसाद यादव यांना आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती देखील केली आहे.
हेही वाचा>> राजीव कुमार यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका, “हेलिकॉप्टर तपासलं गेल्यावर काहींनी घाणेरडी भाषा..”
बिहारमधील ९१२ केंद्रांवर १३ डिसेंबर रोजी आयोजित केलेली बीपीएससी पूर्व परीक्षा देणारे शेकडो उमेदवार १८ डिसेंबरपासून पाटणा येथे निदर्शने करत आहेत. परीक्षेच्या आयोजनावेळी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि जॅमर कार्यरत नव्हते असा आरोप करत ही परीक्षा रद्द करण्याची मागणी हे विद्यार्थी करत आहेत. काही ठिकाणी परीक्षा केंद्रे आणि त्या प्रश्नपत्रिका उशिराने वितरित करण्यात आल्याचाही विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
डिसेंबर २०२५ च्या सायंकाळी विद्यार्थी सोनू कुमार यांने आत्महत्या केल्यानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र बनले. यादरम्यान प्रशांत किशोर यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यापूर्वी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता ज्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले होते.