Prashant Kishor on AAP loss In Delhi Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्लीत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले. यादरम्यान जन सूरज पक्षाचे प्रमुख आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या पराभवाची कारणे काय होती? याबद्दल भाष्य केले आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे ही एक मोठी चूक होती, ज्याची पक्षाला मोठी किंमत पक्षाला मोजावी लागली असं मत किशोर यांनी व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

केजरीवाल यांनी गेल्या काही वर्षांमध्ये बदललेली राजकीय भूमिका जसे की, त्यांनी इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला मात्र दिल्ली निवडणूक एकट्याने लढले. यामुळे देखील दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आमच्या खराब कामगिरीत भर पडली, असे प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना सांगितले.

“दिल्लीत आपच्या मोठ्या पराभवाचे पहिले कारण हे गेल्या १० वर्षांमधील सत्ताविरोधी भावना (Anti-Incumbency) हे आहे. दुसरे कारण आणि कदाचित आपची सर्वात मोठी चूक ही केजरीवाल यांचा राजीनामा देणे ही होती. मद्य धोरण प्रकरणात अटक झाल्यावर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, जामीन मिळाल्यानंतर आणि निवडणुकीच्या तोंडावर दुसर्‍याची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करणे ही मोठी धोरणात्मक चूक ठरली,” असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर म्हणाले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत भारतीय जनता पक्ष २७ वर्षानंतर राजधानीत सत्तेत आला आहे. भाजपाने ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला. तर आप ज्यांनी २०२० मध्ये ६२ आणि २०१५ मध्ये ६७ जागा जिंकल्या होत्या यंदा मात्र अवघ्या २२ जागा जिंकू शकला. तर काँग्रेसला सलग तिसर्‍यांदा एकही जागा जिंकता आली नाही.

केजरीवालांच्या पराभवाचं मुख्य कारण

मतदारांच्या नाराजीचे मुख्य कारण हे केजरीवाल यांचे धरसोड करणारे राजकीय निर्णय असल्याचेही किशोर यांनी नमूद केले. “त्यांची धरसोडीची भूमिका, जसे की पहिल्यांदा इंडिया आघाडीशी जुळवून घेणे आणि नंतर त्यातून बाहेर पडणे, यामुळे त्यांची विश्वासार्हतेला धक्का बसला. याशिवाय अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्यांची प्रशासकीय कार्यपद्धत प्रभावी ठरलेली नाही,” असेही ते म्हणाले.

जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी यावेळी दिल्लीतील प्रशासनाच्या अपयशावर बोट ठेवले. खास करून गेल्या पावसाळ्यात दिल्लीतील सखल भागात रहाणार्‍या नागरिकांना आलेल्या अडचणीचा मुद्दा ‘आप’च्या पराभवासाठीचे मोठे कारण ठरला, असे किशोर यांनी सांगितले.

“लोकांनी सहन केलेला त्रास, विशेषतः झुग्गीमध्ये राहणाऱ्यांनी सहन केलेल्या त्रासांमुळे प्रशासनातील त्रुटी अधोरेखित झाल्या आणि केजरीवाल यांचे प्रशासनाचे मॉडेल मोठ्या प्रमाणात कमजोर झाले,” असे किशोर पुढे बोलताना म्हणाले. मात्र दिल्लीतील पराभव हा केजरीवाल यांच्यासाठी दिल्लीच्या पलीकडे असणार्‍या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याची संधी असल्याचेही किशोर यांनी सुचित केले.

गुजरातवर लक्ष केंद्रीत करा

“या परिस्थितीला दोन बाजू आहेत. जरी दिल्लीत पुन्हा राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे ‘आप’साठी अत्यंत कठीण असेल, पण केजरीवाल आता प्रशासनाच्या जबाबदारीतून मुक्त आहेत. याचा वार केजरीवाल दुसर्‍या राज्यांमध्ये पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी वापरू शकतात, जसे की गुजरात, जेथे ‘आप’ने गेल्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती,” असे प्रशांत किशोर म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishor on aap loss in delhi election result 2025 says arvind kejriwal should have resigned after arrest marathi news rak