२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. भाजपासह एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. एनडीएला या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळालं आहे. तसंच आता एनडीएचं सरकारही देशात स्थापन होतं आहे आणि मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. इंडिया आघाडीला २३४ जागा देशभरात मिळाल्या आहेत. निकालाच्या दिवशी ज्या जागांची संख्या समोर आली ती संख्या एक्झिट पोलच्या अंदाजात वर्तवण्यात आलेल्या संख्येपेक्षा आणि राजकीय रणनीतीकारांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा विरुद्ध होत्या. याबाबत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाष्य केलं आहे. तसंच त्यांनी त्यांचा अंदाजही चुकल्याचं मान्य केलं आहे. ४०० पारच्या घोषणेबाबतही त्यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले प्रशांत किशोर?
भाजपाची सर्वात मोठी कमकुवत बाजू काय असेल तर वाजवीपेक्षा जास्त मोदींवर अवलंबून राहणं ही आहे. कार्यकर्ते ४०० पारचा नारा घेऊन बसले होते, त्यांना वाटलं की खरंच तेवढ्या जागा येतील. आता आपल्या खासदाराला थोडा धडा शिकवला पाहिजे. मी माझ्या मतदारसंघातलं चित्र सांगतो. आरा येथील आर. के. सिंह यांचं उदाहरण घ्या. कुणालाही त्यांच्याबाबत विचारा ते सांगतील सिंह यांनी चांगलं काम केलं आहे, मंत्री म्हणूनही ते चांगले होते. पण कार्यकर्ते नाराज का आहेत? तर ते कार्यकर्त्यांची विचारपूसही करायचे नाहीत.
हे पण वाचा Lok Sabha Election Results : प्रशांत किशोर, योगेंद्र यादव की Exit Polls, कोणाचा अंदाज ठरला खरा?
वाराणसीचं उदाहरण देत काय म्हणाले किशोर?
भाजपाला पाठिंबा देणाऱ्या लोकांना वाटलं होतं ४०० पारचा नारा दिला आहे, यांच्या ४०० पार जागा येतील. वाराणसीत मोदी सुरुवातीला पिछाडीवर होते. २०१४ च्या तुलनेत त्यांचा व्होट शेअर २ टक्के कमी झाला आहे. मात्र मार्जिन बरंच कमी झालं आहे. मोदींच्या विरोधकाचं व्होट शेअर २०.९ होतं ते यावेळी ४१ टक्के झालं. वाराणसीत मतदारांना हे वाटत होतं मोदींना रोखायचं आहे. प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं.
माझा अंदाज चुकला हे मला मान्य
प्रशांत किशोर यांनी अंदाज वर्तवला होता की २०२४ मध्ये भाजपा ३०३ जागा किंवा त्याहून अधिक जागा मिळतील आणि काँग्रेसला १०० जागांपेक्षाही कमी जागा मिळतील. त्याबाबत विचारलं असता प्रशांत किशोर म्हणाले, “मला मान्य आहे की माझा अंदाज चुकला. पण हे अगदीच घडू शकतं. अखिलेश यादव हे या निवडणुकीत हिरो ठरले आहेत. अखिलेश यादव, अमित शाह यांनीही विविध अंदाज वर्तवले होते. तेदेखील चुकले, याचा अर्थ असा होत नाही की अंदाज करणाऱ्यांची राजकीय जाण संपली. राहुल गांधीही मध्य प्रदेशात आमचं सरकार येईल असं म्हणाले होते तिथे भाजपाचं सरकार आलंय. याचा अर्थ असा नाही की त्यांची राजकीय समज संपली आहे. अंदाज वर्तवण्यात चूक होऊ शकते.” असं म्हणत प्रशांत किशोर यांनी चूक मान्य केली आहे. तसंच ४०० पारच्या नाऱ्यावर त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं.
४०० पारचा नारा ज्या कुणी दिला…
४०० पारचा नारा ज्या कुणी दिला त्यामुळे भाजपाला सर्वाधिक फटका बसला. ४०० पारचा नारा हा लोकांना अहंकाराचं प्रतीक वाटला. त्यावर विरोधी पक्षाने असाही प्रचार केला की यांच्या ४०० पार जागा आल्या तर ते देशाचं संविधान बदलतील. ४०० पारचा नारा चांगला आहे पण हा अर्धवट नारा आहे. ४०० पार इतकाच नारा देऊन सोडून देण्यात आला. २०१४ मध्ये भाजपाचा नारा होता बहुत हो गयी महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. तसंच ४०० पारच्या नाऱ्याच्या मागे पुढे काही नव्हतं. मतदारांना हा नारा पटला नाही. ४०० पारच्या नाऱ्याने भाजपाचं नुकसान केलं.