निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या ‘जनसुराज पदयात्रे’ला ब्रेक लागला आहे. प्रशांत किशोर यांनी १५ दिवसांचा ब्रेक घेतला आहे. १५ दिवसानंतर ते पुन्हा त्याच ऊर्जेनं ‘जनसुराज यात्रा’ सुरू करणार आहेत. पण त्यांनी या पदयात्रेतून माघार घेण्याचं नेमकं कारण समोर आलं आहे. प्रशांत किशोर यांच्या डाव्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली आहे. त्यामुळे ते पदयात्रेत चालू शकत नाहीत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी ‘जनसुराज यात्रे’तून १५ दिवसांचा ब्रेक घेतला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले, “बिहारमधील खराब रस्त्यांवरून दररोज २० ते २५ किलोमीटर चालल्यामुळे माझ्या पायाच्या स्नायूमध्ये दुखापत झाली आहे. त्यामुळे मी सध्या सुरू असलेली पदयात्रा १० ते १५ दिवस पुढे ढकलत आहे. माझी प्रकृती आणखी बिघडली नाही तर ११ जूनपासून मी पुन्हा पदयात्रेला सुरू करण्याचा प्रयत्न करेन. खराब रस्त्यांमुळे माझ्या डाव्या पायाच्या स्नायूला दुखापत झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.”
हेही वाचा- “भाजपाचा पराभव तोपर्यंत अशक्य जोपर्यंत…” प्रशांत किशोर यांचा विरोधी पक्षांना सल्ला
गेल्या दोन दिवसांत पायाच्या स्नायूची दुखापत वाढली
खरंतर, प्रशांत किशोर यांना गेल्या दोन दिवसांपासून समस्तीपूरमध्ये सुरू असलेल्या पदयात्रेत सहभाग घेता आला नाही. गेल्या महिन्यातही त्यांना प्रकृतीची समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना दोन आठवडे विश्रांती घेण्यास सांगितलं होतं. मात्र, त्यावेळी प्रशांत किशोर यांनी पदयात्रा सुरूच ठेवली.
प्रशांत किशोर यांच्या ‘जनसुराज पदयात्रे’नं आतापर्यंत अडीच हजार किलोमीटरहून अधिक अंतर कापलं आहे. बिहारमधील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचण्याचा या पदयात्रेचा हेतू आहे, त्यामुळे ही पदयात्रा पूर्ण होण्यास अनेक दिवसांचा कालावधी लागू शकतो.