निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे. प्रशांत किशोर यांनी एका ट्वीटद्वारे नितीश कुमारांना प्रत्युत्तर दिले, मात्र नंतर त्यांनी हे ट्वीट डिलीट देखील केले आहे. त्यांनी काहीही न लिहिता नितीश कुमार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली. सर्व छायाचित्रांमध्ये नितीश कुमार हे मोदींना हात जोडून अभिवादन करताना आणि हसताना दिसत आहेत.
बुधवारी नितीश कुमार यांनी त्यांचे जुने सहकारी असलेल्या प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधला होता. शिवाय, किशोर यांना प्रचार तज्ज्ञ म्हणत नितीश कुमार यांनी, प्रशांत किशोर हे गुप्तपणे भाजपाची मदत करण्यासाठी काम करत असतील. असेही म्हटले होते.
त्यांच्या विधानाला काही अर्थ नाही –
नितीश कुमार म्हणाले, “इतर राजकीय पक्षांसोबत काम करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना बिहारमध्ये काय करायचे आहे याची आम्हाला चिंता नाही. त्यांना २००५ पासून केले जाणारे ‘एबीसी’ माहित आहे का?” “ते जे काही विधान करत आहेत त्याला काही अर्थ नाही. कदाचित त्यांना भाजपसोबत राहायचे असेल. कदाचित त्यांना त्यांची मदत करावी वाटत असेल,”
वाद कसा सुरू झाला –
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला सोडचिठ्ठी देऊन आरजेडी आणि इतर पक्षांसोबत सरकार स्थापन केल्यावर नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यातील वाद सुरू झाला. यावर प्रतिक्रिया देताना पीके म्हणाले होते की, नितीश कुमार महिनाभरापूर्वी भाजपसोबत होते आणि आता विरोधकांसोबत आहेत. ते कितपत विश्वासार्ह आहे, हे जनतेने ठरवायचे आहे. बिहारमधील नवीन व्यवस्थेचा देशावर काही परिणाम होईल असे मला वाटत नाही. मी याकडे राज्य-विशिष्ट विकास म्हणून पाहतो. राष्ट्रीय राजकारणावर त्याचा काही परिणाम होईल असे मला वाटत नाही, परंतु कोणीही प्रयत्न करण्यास मुक्त आहे.