राजकीय रणनीतीकार तथा जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये जनसुराज्य पक्षाची सत्ता आल्यानंतर तासाभरात राज्यातील दारुबंदी उठवू, असे ते म्हणाले. दारुबंदीमुळे बिहारचं २० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या २ ऑक्टोबर रोजी प्रशांत किशोर त्यांच्या जनसुराज्य पक्षाची अधिकृत घोषणा करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी दारुबंदी उठवण्यासंदर्भात आश्वासन दिलं. तसेच त्यांनी नितीश कुमार यांनाही लक्ष्य केलं.

काय म्हणाले प्रशांत किशोर?

नितीश कुमार यांनी घोषित केलेली दारुबंदी केवळ दिखावा आहे. या दारुबंदीमुळे अवैध दारुविक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्याचं २० हजार कोटी रुपयांचे नुकसान होते आहे. दारुबंदीमुळे काही राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारीही स्वत:चा फायदा करून घेत असून सरकारचं नुकसान होतं आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी दिली.

नितीश कुमारांवरही केली टीका

पुढे बोलताना त्यांनी नितीश कुमारांसह इतर राजकीय पक्षांनाही लक्ष्य केलं. बिहारच्या आजच्या परिस्थितीला जेवढे नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव जबाबदार आहेत, तेवढेच काँग्रेस आणि भाजपा सुद्धा जबाबदार आहे, अशी टीका त्यांनी दिली.

२ ऑक्टोबर रोजी जनसुराज्य पक्षाची घोषणा

यावेळी बोलताना त्यांनी येत्या २ ऑक्टोबर रोजी जनसुराज्य पक्षाची अधिकृत घोषणा करणार असल्याचेही सांगितलं. २ ऑक्टोबर रोजी आम्ही आमच्या पक्षाची अधिकृत घोषणा करणार आहोत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही बिहारमधील पूर्ण २४३ जागा लढवणार आहोत, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishor said he will end bihar liquor ban within an hour if elected spb