राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर लवकरच सक्रीय राजकारणात येणार असल्याच्या चर्चा असतानाच आता त्यांनी एक मोठं राजकीय भाष्य केलं आहे. त्यांनी एक राजकीय भाकित वर्तवलं आहे. प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे की, नितीश कुमारांची अवस्था ही आंध्र प्रदेशच्या चंद्रबाबू नायडूंसारखी होणार आहे. नितीश कुमार सध्या जी भूमिका निभावण्याचा प्रयत्न करत आहेत अशीच भूमिका पाच वर्षांपूर्वी चंद्रबाबू नायडू यांची होती. परंतु नायडू हे किमान आंध्र प्रदेशात बहुमतातलं सरकार तरी चालवत होते. पण नितीश कुमार तर केवळ ४२ आमदार असलेला राज्यातला तिसऱ्या क्रमाकांचा पक्ष चालवत आहेत. ते सध्या बिहारमध्ये लंगडं सरकार चालवत आहेत. निवडणुकीनंतर चंद्रबाबू नायडूंच्या रणनीतींचं काय झालं ते आपण सर्वांनी पाहिलंच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रशांत किशोर म्हणाले की, चंद्रबाबू नायडूदेखील देशातल्या वेगवेगळ्या राज्यांचा दौरा करून विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात होते. त्याच वेळी तिकडे आंध्र प्रदेशात त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. निवडणुकीच्या निकालानंतर ते शांत झाले. कारण त्यांच्या पक्षाचे केवळ तीन खासदार निवडून आले. तर आता त्यांच्याकडे केवळ २३ आमदार आहेत. बहुमतातलं सरकार चालवणारे चंद्रबाबू नायडू सत्तेतून बाहेर फेकले गेले. त्यामुळे तुम्ही लिहून घ्या, नितीश कुमार यांच्यावसुद्धा तशीच परिस्थिती ओढवेल.

प्रशांत किशोर एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी नितीश कुमारांवर हल्लाबोल केला. किशोर म्हणाले, नितीश कुमार यांनी बिहारची काळजी करायला हवी. तिकडे त्यांचं स्वतःचं काही अस्तित्व नाही आणि हे निघालेत विरोधकांना एकत्र करायला.

हे ही वाचा >> “स्टॅम्प आणा, मी लिहून देतो, मविआ…”, अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले, “अशा चर्चा…!”

प्रशांत किशोर यांनी राजदवरही टीका केली. किशोर म्हणाले, “ज्या पक्षाकडे साधा एक खासदार नाही, तो पक्ष देशाचा पंतप्रधान कोण होणार ते ठरवण्याचा प्रयत्न करतोय”. किशोर यांनी नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीवरदेखील प्रतिक्रिया दिली. किशोर म्हणाले, नितीश कुमार पश्चिम बंगालला गेले होते. त्यांनी आता सांगावं की, ममता बॅनर्जी काँग्रेसबरोबर काम करायला तयार आहेत का? बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि स्वतः नितीश कुमार मता बॅनर्जी यांना एक सीट तरी देतील का. मी ममता बॅनर्जींना नितीश कुमार यांच्यापेक्षा चांगलं ओळखतो. बंगालमध्ये नितीश कुमार यांना फारशी किंमत नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishor says nitish kumar will be like chandrababu naidu on unity of opposition parties asc