आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमताचा दावा भाजपाकडून केला जात आहे. काही राजकीय विश्लेषकांकडून जागा कमी झाल्या तरी भाजपाचं सरकार येईल असं म्हटलं जात आहे. तर काहींच्या मते या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून भाजपाला धोबीपछाड दिली जाऊ शकते. मात्र, अनेक चर्चांमधून एक समान प्रश्न विचारला जातो तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर भाजपाकडे कोणता पर्याय आहे? ज्याप्रकारे सध्या राष्ट्रीय राजकारणात ‘मोदी नाही तर कोण?’ असा प्रश्न केला जातो, तसाच आता ‘भाजपामध्ये मोदींनंतर कोण’ असा प्रश्न चर्चेत येऊ लागला आहे. नेमका याच मुद्द्यावर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. ते ‘इंडियन एक्स्प्रेस अड्डा’मध्ये बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी-शाह आणि वाजपेयी-आडवाणी!

यावेळी बोलताना प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी-अमित शाह व अटल बिहारी वाजपेयी-लालकृष्ण आडवाणी यांच्या कामाच्या पद्धतीची, विचारसरणीची आणि दृष्टीकोनाची तुलना केली. “तुम्ही सेहवाग आणि द्रविड एकाच वेळी असू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही सोनिया गांधी आणि इंदिरा गांधी एकाच वेळी असू शकत नाहीत. त्या दोघींनी एकच पक्ष, एकच विचारसरणी, एकाच प्रकारच्या लोकांसोबत काम केलंय, पण दोघींचा करण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्याचप्रमाणे मोदींचा दृष्टीकोन वाजपेयींपेक्षा वेगळा आहे. ते दोघे एकाच विचारसरणीचे असूनही त्यांची पद्धत वेगवेगळी आहे. त्यामुळे आता मोदी-शाहा अचानक वाजपेयींसारखे सर्वांच्या सहमतीने चालणारे होऊ शकत नाहीत. ते जे करत आले आहेत, तेच त्यांना करत राहावं लागणार आहे”, असं प्रशांत किशोर म्हणाले.

“भाजपाचा पुढचा पंतप्रधान मोदींपेक्षा जहाल”

“मला कुणीतरी विचारलं की मोदींचा वारसदार कोण असेल? मी नेहमी म्हणतो की ते कुणालाही माहिती नाही. कुणीही त्याबद्दलचा अंदाज बांधायला नको. पण एक मात्र नक्की आहे. जो कुणी त्यांच्यानंतर येईल, तो मोदींपेक्षा जास्त जहाल असेल. तेव्हा तुलनेनं मोदी भाजपाच्या पुढील पंतप्रधानापेक्षा जास्त मुक्त विचारांचे वाटू लागतील”, असं सूचक विधान यावेळी प्रशांत किशोर यांनी केलं आहे.

“सर्व भाजपाचे मुख्यमंत्री आज त्यांच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त कट्टर हिंदुत्ववादी भासवण्याच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे आज मध्य प्रदेश किंवा राजस्थानचे मुख्यमंत्री सातत्याने त्यांच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त जहाल वाटण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चालत आलं आहे. त्यामुळे त्या जागी जो कुणी येईल, त्याला तसं वागण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही”, अशी पुस्तीही यावर प्रशांत किशोर यांनी जोडली.

“योगींना मोदींच्या स्तरापर्यंत पोहोचायला अजून खूप अवकाश”

योगी आदित्यनाथ मोदींच्याच पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत असूननरेंद्र मोदींनंतर भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार योगी असू शकतात, असं मानणारा एक मतप्रवाह राजकीय वर्तुळात आहे. मात्र, असं मानल्यास ती चूक ठरेल, अशी स्पष्ट भूमिका प्रशांत किशोर यांनी व्यक्त केली आहे. “योगी अजिबात मोदींसारखे नाहीत. मोदींप्रमाणे योगी त्यांच्या स्वबळावर उत्तर प्रदेश जिंकून आणू शकत नाहीत. मोदी अजूनही मोठ्या संख्येनं मतं आकर्षित करणारे नेते आहेत. भाजपात इतरही नेते आहेत. पण त्यांच्यात आणि मोदींमध्ये खूप मोठं अंतर आहे”, अशा शब्दांत प्रशांत किशोर यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

Video: भाजपाच्या हिंदुत्वाला काँग्रेस हरवू शकते का? प्रशांत किशोरांनी आकडेवारीच मांडली; म्हणाले, “३८ टक्के नाही…!”

“तुम्ही मोदींना बाजूला करून फक्त योगींच्या भरंवशावर उत्तर प्रदेशात निवडणूक घ्या, त्यांना फार अडचणी येतील. वाजपेयी-आडवाणींच्या काळात मोदी गुजरातमध्ये खूप लोकप्रिय होते. पण त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी वाजपेयींची गरज होती. तीच स्थिती सध्या योगींची आहे. योगींचं मोठं नाव सध्या तयार होतंय, पण अजून त्यांना मोदींच्या स्तरावर पोहोचायला खूप अवकाश आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishor speaks on narendra modi and yogi adityanath who will be next pm pmw