Prashant Kishor to from Political Party : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अधिकृतपणे राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. ते येत्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी अधिकृतपणे पक्ष स्थापन करतील. जन सुराज असं त्यांच्या पक्षाचं नाव असू शकतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये जन सुराज यात्रा काढली होती. मात्र ते निवडणुकीच्या मैदानात उतरले नव्हते. या जनसुराज यात्रेच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक काळात लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं. आता ते याच जनसुराज यात्रेला, याच्याशी संबंधित संघटनेला राजकीय पक्षाचं स्वरुप देणार आहेत. रविवारी बिहारची राजधानी पाटणा येथील बापू सभागृहात जनसुराजच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना प्रशांत किशोर यांनी यासंबंधीची घोषणा केली.

प्रशांत किशोर यांनी यावेळी ‘जय बिहार, जय-जय बिहार’ या मोहिमेबाबात चर्चा केली. ते जनसुराजच्या पदाधिकाऱ्यांना म्हणाले, तुम्ही आज पहिल्यांदा आम्हाला भेटायला इथे आला नाहीत, आम्ही तुम्हाला संबोधित करण्यासाठी तुमच्या गावांमध्ये आलो होतो, तिथे तुमच्या घरी आपली भेट झाली होती. आता आपण एकजूट निर्माण करुया. येत्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर आपण ‘जन सुराज’चा पाया रचूया. तुम्ही जन सुराज या पदयात्रेशी किंवा जन सुराजशी संबंधित लोकांशी स्वतःला जोडलेलं नाही. तुम्ही बिहारच्या हितासाठी आंदोलन करणाऱ्या लोकांशी स्वतःला जोडलं आहे.

पक्षाचा अध्यक्ष कोण असणार?

पक्ष स्थापनेच्या दिवशी १.५० लाख सदस्यांची नोंदणी केली जाईल, असं प्रशांत किशोर यांनी यावेळी सांगितलं. प्रशांत किशोर हे जन सुराज पक्षाचं नेतृत्व करतील अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या, ज्या त्यांनी फेटाळून लावल्या. ‘मी जन सुराज पक्षाचा अध्यक्ष नसेन’, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले, “आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत जनतेची ताकद वाढवणारे नेते आपापल्या मतदारसंघातून निवडून येतील.”

Prashant Kishor Jan Suraaj party launch message to Dalits Muslims
प्रशांत किशोर यांची मुख्य ओळख निवडणूक रणनीतीकार अशी आहे. (छायाचित्र : संग्रहित)

हे ही वाचा >> Delhi Coaching Incident: दिल्लीत IAS कोचिंग सेंटर दुर्घटनेनंतर एमसीडीची मोठी कारवाई, तळघरांतील १३ कोचिंग सेंटर्स सील

रोजगारासाठी लोक बिहारला येतील : प्रशांत किशोर

प्रशांत किशोर म्हणाले, २०२५ मध्ये आपला पक्ष बिहारमध्ये जनतेचं स्वराज्य आणेल. आपल्या जनतेचं भविष्य सुनिश्चित करण्यासाठी जन सुराज पार्टी मेहनत घेईल. आपल्या राज्यातील तरुण नोकरीसाठी पंजाब व हरियाणाला जातात. आपला पक्ष सत्तेत आल्यावर आपण आपल्याच राज्यात रोजगारनिर्मिती करू, जेणेकरून आपल्या तरुणांना आपलं राज्य सोडून इतरत्र कुठेही जावं लागणार नाही. येत्या काळात इतर राज्यांमधील लोक रोजगारासाठी बिहारला येतील.