२०१४मध्ये भाजपासाठी इलेक्शन कॅम्पेनिंगचं नियोजन करणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाविरोधातल्या विरोधी पक्षांच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत किशोर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाजपविरोधी विरोधी पक्षांच्या आघाडीचं समर्थन करताना दिसत आहेत. त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील सुरू केले आहेत. मात्र, यासंदर्भात प्रशांत किशोर यांची भूमिका वेगळी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत किशोर यांना ममता बॅनर्जी विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी एवढंच पुरेसं ठरणार नाही, अशी भूमिका मांडली. “फक्त विरोधकांनी एकत्र येणं भाजपाला हरवण्यासाठी पुरेसं ठरणार नाही. तर विरोधी पक्ष भाजपाविरोधात एकत्र आले, तर एक मजबूत संघटन उभं राहाताना दिसू शकेल. पण त्या आघाडीने भाजपाविरोधात निवडणूक जिंकणं ही पूर्णपणे वेगळी बाब आहे. आपण याआधी देखील पाहिलं आहे की भाजपानं अशा आघाड्यांना पराभूत केलं आहे”, असं प्रशांत किशोर म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये काय झालं?

यासंदर्भात बोलताना प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांचं उदाहरण दिलं. “आपण उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये हे पाहिलं आहे. समाजवादी, बसपा आणि इतर पक्ष मिळून भाजपाविरोधात उभे राहिले. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आसाममध्ये देखील महागठबंधनला भाजपाविरोधात पराभूत व्हावं लागलं. हे जे काही घडलं, त्यातून धडा घ्यायला हवा. फक्त भाजपाविरोधात इतर विरोधी पक्षांनी एकत्र येणं हाच विजयाचा मूलमंत्र होऊ शकत नाही”, अशा शब्दांत प्रशांत किशोर यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

आघाडीसोबत अजून काय हवं?

भाजपाला पराभूत करण्यासाठी यावेळी बोलताना प्रशांत किशोर यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे. “भाजपाच्या विरोधात फक्त विरोधी पक्षांच्या एकत्र येण्यामुळे लोक त्यांना मतदान करणार नाहीत असं मला वाटतं. त्यासाठी तुमच्याकडे एक चेहरा असायला हवा. एक नरेटिव्ह असायला हवं. त्यानंतर इतर गोष्टी येतात”, असं प्रशांत किशोर म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishor warns opposition anti bjp alliance not sufficient for win pmw