Prashant Kishore : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर ( Prashant Kishore ) यांनी आता राजकारणात धडाक्यात एंट्री घेतली आहे. पाटणा या ठिकाणी बुधवारी त्यांनी ‘जन सुराज’ या त्यांच्या पक्षाची घोषणा केली आहे. बिहारमध्ये त्यांचा जन सुराज हा पक्ष बडा करीश्मा करुन दाखवेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. मनोज भारती हे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष असतील.
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाची घोषणा
प्रशांत किशोर ( Prashant Kishore ) यांनी जन सुराज पक्षाची घोषणा पाटणा येथील व्हेटरनरी महाविद्यालयाच्या मैदानावर केली. यानंतर ते लोकांना संबोधित करत म्हणाले की मागच्या अडीच वर्षांपासून जन सुराज पक्ष आणण्याची तयारी सुरु होती. सगळे लोक विचारत होते की तुम्ही पक्षाची घोषणा कधी करणार? आज मी ही घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृतरित्या पक्षाचा दर्जा दिला आहे. हे नाव योग्य आहे ना? असंही प्रशांत किशोर यांनी जमलेल्या गर्दीला विचारलं. सगळ्यांनी अनुमोदन दिलं आहे. पक्षाच्या स्थापनेच्या आधी प्रशांत किशोर यांनी जी मोहीम चालवली त्यात त्यांनी चंपारण येथून राज्याची सुमारे ३ हजार किलोमीटरची पदयात्रा केली. ही पदयात्रा दोन वर्षांपूर्वी सुरु झाली होती. महात्मा गांधी यांनी देशातला पहिला सत्याग्रह सुरु केला होता. २ ऑक्टोबरच्या दिवशी म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी त्यांनी पक्षाची घोषणा केली आहे. बिहारच्या जनतेला आता नव्या राजकीय पक्षाचा पर्याय या निमित्ताने निर्माण झाला आहे.
हे पण वाचा- “बिहारमध्ये सत्ता आल्यास, तासाभरात दारुबंदी उठवू”; जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांची घोषणा
जय बिहारचा नारा दिल्लीपर्यंत पोहचला पाहिजे
बिहारमध्ये आज मी एक नारा देतो आहे, तो नारा आहे जय बिहार! असं प्रशांत किशोर म्हणाले. प्रशांत किशोर यांनी हा नारा देऊन लोकांनाही त्यांच्या पाठोपाठ ही घोषणा दिली. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना बिहारी असं हिणवत कुणीही बोलू नये म्हणून जय बिहारची घोषणा द्या असं प्रशांत किशोर म्हणाले. आज अशी घोषणा द्या की दिल्लीपर्यंत आपला आवाज पोहचला पाहिजे. असंही प्रशांत किशोर ( Prashant Kishore ) यांनी म्हटलं आहे.
प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जात होते. प्रशांत किशोर ( Prashant Kishore ) यांनी निवडणूक जिंकण्यासाठीची रणनीती नरेंद्र मोदींना २०१४ मध्ये आखून दिली होती. तसंच २०१७ मध्ये ममता बॅनर्जी यांच्यासाठीही काम केलं होतं. काँग्रेससह देखील त्यांची बोलणी झाली होती. भारतातले एक उत्तम रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडे पाहिलं जातं ते आता राजकीय आखाड्यात पक्ष घेऊन उतरले आहेत.