नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन नवीन न्यायाधीशांना शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. प्रशांत कुमार मिश्रा आणि ज्येष्ठ वकील कल्पती वेंकटरामण विश्वनाथन यांना शपथ देण्यात आली. यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या ३४ झाली आहे. गेल्या सात दिवसांमध्ये न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. एम आर शहा हे निवृत्त झाल्यामुळे ही संख्या ३२ झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील न्यायवृंदाने १६ मे रोजी या दोन नावांची केंद्राकडे शिफारस केली होती. केंद्र सरकारने दोन दिवसांत त्याला मंजुरी दिली आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी तसे आदेश काढले. शपथविधी कार्यक्रमात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढील महिन्यात निवृत्त होणाऱ्या न्या. के एम जोसेफ, न्या. अजय रस्तोगी आणि न्या. व्ही रामसुब्रमण्यन यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढले.

शपथ घेतलेल्यांपैकी न्या. विश्वनाथन हे ११ ऑगस्ट २०३० ते २५ मे २०३१ या काळात भारताचे सरन्यायाधीश होतील. वकील म्हणून काम करताना बारमधून थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक होऊन सरन्यायाधीश होण्याचा मान मिळवणारे न्या. के व्ही विश्वनाथन हे केवळ चौथे न्यायाधीश असणार आहेत. त्यांच्यापूर्वी न्या. एस एम सिक्री आणि न्या. यू यू लळित या दोघांनीच हा मान मिळवला आहे. न्या. पी एस नरसिंह २०२८ मध्ये सरन्यायाधीश होतील, तेही बारमधून थेट सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झाले आहेत. न्या. मिश्रा हे  २००९ पासून २०२१ पर्यंत छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर १३ ऑक्टोबर २०२१ मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी उच्च न्यायालयात १३ वर्षे न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे आणि संपूर्ण भारतात ज्येष्ठत्वामध्ये त्यांचा क्रमांक २१ वा आहे.

न्या. जोसेफ, रस्तोगी, रामसुब्रमण्यन यांची जूनमध्ये निवृत्ती

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ३४ म्हणजे मंजूर क्षमतेइतकी असण्याची स्थिती अल्पकाळ म्हणजे एकच दिवस राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाला २२ मे ते २ जुलै या कालावधीत उन्हाळी सुट्टय़ा आहेत. त्यादरम्यान न्या. के एम जोसेफ १६ जूनला, न्या. अजय रस्तोगी १७ जूनला आणि न्या. व्ही रामसुब्रमण्यन २९ जूनला निवृत्त होणार आहेत. तर सुट्टीनंतर न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर २ जुलैला न्या. कृष्णा मुरारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे लवकरच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची एकूण संख्या ३० इतकी होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant mishra kv viswanathan take oath as supreme court judges zws