लोकसत्ता प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसने आज रात्री चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या जागेवरील उमेदवारीबाबत काँग्रेसमध्ये निर्माण झालेला तिढा आज अखेर सुटला.
वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभेसाठी नैसर्गिक उमेदवार मानल्या जात होत्या. परंतु चंद्रपूरमधून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. त्यामुळे या जागेबाबत पक्षपातळीवरील तिढा निर्माण झाला होता. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध देखील बघावयास मिळाले. या परिस्थितीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विजय वडेट्टीवार यांना स्वत: लढण्यास सूचना केली. परंतु वडेट्टीवार स्वत: न लढता मुलीसाठी आग्रही होते. त्यामुळे अखेर पक्षश्रेष्ठींनी आज प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली. हा मतदारसंघ चंद्रपूर, वणी आणि आर्वी असा विस्तारला आहे. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याचा यात समावेश असून दिवंगत बाळू धानोरकर यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ही जागा जिंकून दिली होती.
हेही वाचा >>>‘वंचित’ रिंगणात उतरल्यास महाविकास आघाडीची वाट बिकट; यवतमाळ-वाशीममध्ये २०१९ ची पुनरावृत्ती होणार ?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला विजय मिळवता आलेली ही एकमेव जागा होत, हे येथे उल्लेखनीय. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या जागेवर शिवानी वडेट्टीवार यांनी दावा करण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणूक घोषणा होताच पक्षाकडे आपल्या मुलीसाठी ही जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु येथील जातीय समीकरण आणि दिवंगत नेत्या पत्नीला उमेदवारी देण्याचा परंपरा साजेसा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
जयपूरचा उमेदवार बदलला
काँग्रेसने जयपूरमध्ये सुनील शर्मा यांच्या ऐवजी प्रताप सिंह खाचरियावास यांना उमेदवारी दिली आहे. जयपूर लोकसभेची उमेदवारी सुनील शर्मा यांना देण्यात आली होती. परंतु ते कायम पक्षावर टीका करून पक्षांतर्गत वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे दिसून आल्यावर त्यांना पक्षाने बदलण्याचा निर्णय घेतला. तर राजस्थानमधील दौसा येथून मुरारीलाल मीना यांना संधी देण्यात आली आहे. ही जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.